कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी फेटाळली. मतदार यादीतील प्रमाणित दाखला अर्जासोबत वेळेत न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला होता. याविरोधात त्यांनी ही याचिका दाखल केली होती. आता ते सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. जगदाळे हॉल, राजारामपुरी येथील निवडणूक कार्यालयात शिवाजी उद्यमनगर प्रभागातून आर. डी. पाटील हे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी गेले होते. परंतु त्यांचा मतदार यादीतील नावाचा प्रमाणित दाखला वेळेत न जोडल्याने त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी छाननीवेळी अवैध ठरविला होता. याप्रकरणी पाटील यांनी गुरुवारी (दि. १५) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासमोर सुनावणी झाली. पाटील यांच्या वतीने अॅड. प्रमोद परांजपे यांनी बाजू मांडली. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे; त्यामुळे यात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून ही याचिका फेटाळली. त्यामुळे पाटील यांनी आता सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
आर. डी. पाटील यांची याचिका फेटाळली
By admin | Updated: October 17, 2015 00:20 IST