तालुक्यात ३९८५० इतकी कोरोनाची लस आली आहे. १८ ते ४४ वर्षांच्या दरम्यानच्या युवकांना लस देण्यासाठी उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात आजरा ग्रामीण रुग्णालय, वाटंगी, भादवण, उत्तूर, मलिग्रे अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७ उपकेंद्रांमधून लस देण्याचे काम सुरू आहे. शहरातील ९० टक्के लोकांनी अद्यापही लस घेतलेली नाही. आरोग्य विभागाने कोल्हापूरहून लस आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. आलेली लस प्रत्येक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला वेळेवर पोहोच केली जाते. आरोग्य विभागाने चार दिवसांपासून फक्त दुसरा कोरोनाचा डोस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस मिळत नाही. मिळणारी लस घेण्यासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी वयोवृद्धांना उन्हातच उभे राहावे लागत आहे.
१८ ते ४४ वर्षे दरम्यानच्या युवकांना लसीचा तुटवडा
तालुक्यात येणारी कोरोनाची लस अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातच शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वर्षांदरम्यानच्या युवकांना कोरोनाचे लसीकरण करण्याचा संकल्प सोडला होता. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने युवक अद्यापही कोरोनाच्या लसीपासून वंचित आहेत.
-
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दिलेली लस - आजरा ग्रामीण रुग्णालय - ७७८५ - उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र - ८२०७ - भादवण प्राथमिक आरोग्य केंद्र - ६९९७ - मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्र - ९७१३ - वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्र - ८८५०.