इचलकरंजी : प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आस्थापना सुरू न ठेवता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली. यामध्ये सहा जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
इचलकरंजी शहरामध्ये कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या आदेशानुसार पथकातर्फे तपासणी सुरू आहे. यावेळी शहरातील काही आस्थापने नियमबाह्य सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मंगळवारी वेलनेस मेडिकल, सुशिला मेडिकल, राज मेडिकल, चौगुले मेडिकल या औषध दुकानांमध्ये औषधे सोडून इतर साहित्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. वेळेनंतर आस्थापने सुरू ठेवल्यामुळे दीपक मोरे व अरोमा बेकरी यांच्याकडून २१ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. नगरपालिकेकडून यापुढे कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपमुख्याधिकारी केतन गुजर आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी सांगितले.