कोल्हापूर : नरबळी ठरलेल्या वरद पाटील या चिमुकल्याच्या खुन्याला कडक शिक्षा करा, अशा मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी वरद पाटील अमर रहे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अमर रहे, कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, खुन्यांना शासन झालेच पाहिजे. भारतीय संविधान जिंदाबाद. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नरबळी विरोधी कायदा लागू व्हावा, यासाठी आयुष्यभर झटले. समाजातील वाईट प्रथा, चालीरीती, रूढी, अंधश्रद्धा बंद व्हाव्यात. यासाठी संत व समाजसुधारकांनी अविरत प्रयत्न केले; पण चार्वाक, तुकाराम, महात्मा गांधी आणि आता नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. रघुनाथ कांबळे यांनी वरद पाटील याच्या खुन्यांना कायद्यातील तरतुदीनुसार कडक शासन झालेच पाहिजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी मागणी केली. भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्ष प्राध्यापिका सुनीता अमृतसागर यांनी अंधश्रद्धा दूर करणे हे कार्यकर्त्यांपुढील मोठे आव्हान असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सह सेक्रेटरी दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, इर्शाद फरास, सादिक मुल्ला, नजीर कुरणे, सपना दवंडे, पंकज महापुरे, शहाबुद्दीन मोगणे, आसिफ मुल्ला ,गौरव कांबळे, इस्माईल सय्यद, सचिन घाडगे, जितेंद्र सुतार, मोहन क्षत्रिय आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
फोटो नं २५०८२०२१-कोल-कँडल मार्च
ओळ : कोल्हापुरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कँडल मार्च काढण्यात आला.