संदीप बावचे - शिरोळ -तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी तब्बल ७२ प्रस्ताव गौण खनिज विभागास प्राप्त झाले आहेत. वाळू उपशाच्या परवानगीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने तो मंजुरीचा प्रयत्न १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत ठेकेदारांकडून होणार आहे. यंदाही लघुत्तम किमती वाढणार असल्यामुळे वाळू पुन्हा महागच होणार आहे.जिल्ह्यात वाळूचे केंद्र म्हणून शिरोळ तालुक्याला ओळखले जाते. कृष्णा नदीपात्रातील वाळू म्हणजे काळं सोनं म्हणून नावारूपास आले आहे. तालुक्यातून औरवाडसह गौरवाड, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, उदगांव, चिंचवाड, कोथळी, राजापूर, अकिवाट, खिद्रापूर, कवठेसार आदी ठिकाणांहून वाळूचे प्लॉट काढले जातात. २५ लाखांपासून काही कोटींपर्यंत प्लॉटचे लिलाव बोलले जातात. असे असले तरी शिरोळ तालुक्यातील ठेकेदारांना वाळू तस्करी नवीन नाही. वाळूचा एक प्लॉट घ्यायचा व बेकायदेशीर अनेक प्लॉट सुरू करायचे यात ठेकेदारांचा हातखंडा आहे. चालू वर्षी तर वाळू तस्करांनी अक्षरश: नदी पात्रात बोटींचे तळच टाकल्याचे चित्र होते. वाळूचे प्लॉट बदलण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी झाले होते. शिवाय पावसाने दडी मारल्याने मोेठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला. तसेच वाळू साठ्यांचे अनेक बेकायदेशीर साठे ठेकेदारांनी केले आहेत. आता नव्याने होणाऱ्या वाळू उपसा परवान्यासाठी तब्बल ७२ प्रस्ताव गौण खनिज विभागास आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. वाळू उपसाच्या परवान्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने तो मंजूर करण्यासाठी वाळू तस्करांचा प्रयत्न असणार आहे. विशेषकरून नदी पलीकडील सात गावातील तस्करांचा प्रयत्न असणार आहे.गतवर्षी लघुत्तम किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सुमारे दोन कोटी रूपयांपर्यंत एका वाळू प्लॉटचा लिलाव झाला. अव्वाच्या सव्वा असा लघुत्तम किमतीचा दर म्हणणाऱ्या वाळू ठेकेदारांनी कोटीचे प्लॉट घेतले होते. यामुळे वाळू व्यवसायातून निश्चितच मोठा फायदा ठेकेदारांना होतो हे उघड झाले आहे. गतवर्षी ९० पेक्षा अधिक वाळू साठ्यांचे प्रस्ताव गौण खनिज विभागाला प्राप्त झाले होते. यंदा कमी प्रमाणात प्रस्ताव आले आहेत. चालूवर्षी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीमुळे अनेक ठेकेदारांचे उखळ पांढरे झाल्यामुळे वाळूचे प्रस्ताव कमी आल्याची चर्चा आहे. येणाऱ्या हंगामात तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाळू ठेकेदारांचे प्रस्ताव स्वातंत्र्यदिनाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: July 31, 2015 22:50 IST