सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या राखेच्या प्रदूषणामुळे निम्म्या सांगली शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना प्रशासनास वारंवार नोटिसा बजावूनही त्यावर उपाययोजना केल्या जात नसल्याने कारखाना बंद ठेवण्याचा प्रस्ताव मंडळाने कोल्हापूरच्या प्रादेशिक कार्यालयाकडे आणि मुंबईतील मुख्यालयाकडे नोव्हेंबरमध्येच पाठवला आहे. शिवाय यंदा गाळप परवान्यासही सहमती पत्र दिलेले नाही, अशी माहिती ‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी लिंबाजी भड यांनी मंगळवारी दिली.वसंतदादा कारखान्याला १९५६ मध्ये परवाना मिळाला आहे. त्यावेळी सांगली शहराची लोकसंख्या तुटपुंजी होती. कारखान्याच्या परिसरात मानवी वस्ती फारशी नव्हती. मात्र नंतर शहरासह उपनगरांमध्ये लोकसंख्या वाढली. यामुळे कारखाना सध्या शहराच्या अगदी जवळ आला आहे. कारखान्याचे आठ बॉयलर असून, प्रतिदिन दहा हजार टन ऊस गाळपाची क्षमता आहे. जवळ मानवी वस्ती नसल्यामुळे सुरुवातीला कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या प्रदूषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पण, सध्या शांतिनिकेतन, पंचशीलनगर, घनशामनगर, चिंतामणीनगर, संजयनगर, यशवंतनगर, माधवनगर परिसरात रहिवाशांची संख्या वाढली आहे. दाट मानवी वस्ती झाली आहे. तरीही प्रशासनाने कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेवर उपाययोजना केलेली नाही. आठ बॉयलरमध्ये वेट क्रबर मशीन (बॉयलरमध्ये तयार होणारी राख पाणी मारून जाग्यावर पाडणारी यंत्रणा) बसवलेली नाही. ही यंत्रणा बसवण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार सूचना व नोटिसा दिल्या आहेत. अनेक नोटिसा बजावल्यानंतर आठपैकी तीन बॉयलरला वेट क्रबर यंत्रणा बसवली आहे. परंतु, तीही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी बंद ठेवली आहे. यामुळेच सध्या निम्म्या सांगलीच्या शहरापर्यंत कारखान्याची राख पोहोचत आहे. सांगली-तासगाव रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी प्रवाशांना तर राखेशी सामना करतच प्रवास करावा लागतो. अनेकवेळा डोळ्यात राख गेल्यानंतर ती काढण्यासाठी नेत्रतज्ज्ञांकडे जावे लागत आहे. परिसरातील लहान बालकांना राखेच्या प्रदूषणामुळे अस्थमाचा त्रास होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. राखेच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन ‘प्रदूषण’च्या सांगली कार्यालयाने कारखाना बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालय व मुख्यालयाकडे नोव्हेंबरमध्ये पाठविला आहे. या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. दुसऱ्या बाजूला लोकांकडून दबाव वाढल्यामुळे ‘प्रदूषण नियंत्रण’च्या सांगली कार्यालयाने पुन्हा पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार येत्या आठ दिवसात कारखान्यावर निश्चित कारवाई होईल, असे मत भड यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)चिमणीची उंची ७० मीटर गरजेचीवसंतदादा साखर कारखान्यातून मोठ्याप्रमाणात राख बाहेर पडत आहे. ती थांबवण्यासाठी सर्व बॉयलरना वेट क्रबर यंत्रणा बसविण्याची किंवा कारखान्याच्या चिमणीची उंची किमान ७० मीटर असण्याची गरज आहे. परंतु, कारखान्याची चिमणी सध्या केवळ तीस मीटरच आहे. यामुळे परिसरात राख मोठ्याप्रमाणात पडत आहे. चिमणीची उंची वाढवणे आणि बॉयलरला वेट क्रबर यंत्रणा बसवणे याबाबत सूचना दिली आहे, अशी माहिती ‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी लिंबाजी भड यांनी दिली.वसंतदादा कारखान्याची राख संपूर्ण सांगली शहरात पसरत आहे. या राखेमुळे वाहनधारकांच्या डोळ्याला इजा होत आहे. त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या साऱ्या गोष्टीला कोण जबाबदार? प्रदूषण मंडळाकडून वेळीच कारवाईची अपेक्षा आहे. कारखान्याने चिमणीची उंची वाढवून राखेबाबत ठोस उपाय शोधला पाहिजे.- सिद्धार्थ नाशिककर, अभयनगरउपाययोजना करण्याची मागणीकारखाना परिसरात राखेचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस या भागातील प्रदूषण वाढत आहे. कारखाना सुरू राहण्याबाबत आमचा विरोध नाही, पण राखेवर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक विठ्ठल मोहिते यांनी केली.
वसंतदादा साखर कारखान्यावर बंदीचा प्रस्ताव
By admin | Updated: January 13, 2016 01:32 IST