शहीद जवान महादेव तोरस्कर यांच्या पत्नी वृषाली तोरस्कर यांनी घर बांधण्यासाठी बड्याचीवाडी येथून अडवणूक होत असल्याने मंगळवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत ही घोषणा केल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहे. यासंदर्भात गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने भाष्य करता येत नाही, तरीदेखील समेट घडवून आणण्यासाठी तक्रारदार तोरस्कर व न्यायालयात याचिका दाखल केलेले बड्याचीवाडी कॉलनीतील शिक्षक व डॉक्टर यांची स्वतंत्रपणे बैठक घेतली. दोघांचीही समजूत काढण्याचा आणि दोन पावले मागे येण्याची विनंती केली आहे. तसेच तोरस्कर यांना गडहिंग्लज व भडगाव येथील पाच जागा दाखविल्या आहेत. यापैकी त्या जी जागा पसंद करतील, ती देण्याची प्रशासनाची तयारी आहे, असे पारगे यांनी सांगितले.
दरम्यान, आजी माजी सैनिक संघटनेचे तुकाराम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही पर्यायी जागेचा प्रस्ताव प्रशासनाकडून आला आहे; पण ती जागा आडवळणाला असल्याने आम्ही नकार दिला आहे. बड्याचीवाडी येथील तक्रारदार नागरिकांचे वर्तन शहीद जवानांच्या प्रती योग्य नाही. त्यांच्याकडून शहीद होण्याचाच अपमान झाल्याने हीच जागा घेण्याबाबत तोरस्कर आग्रही असल्याचे सांगितले. यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी ६ फेब्रुवारीला होणार होती; पण ती आता ३० जानेवारीला करण्याचे नियोजन सुरू असल्याचे कळते, असे जाधव यांनी सांगितले.