कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांना जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खासगी प्रॉपर्टी जाहीर करावी, अन्यथा येत्या आठ दिवसांत शिवसेनेतर्फे लाचलुचपत विभागाकडे नावांसह तक्रार केली जाईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली. शहरात डांबरीकरण केलेले सर्व रस्ते खराब झाले आहेत. या खराब रस्त्यांना जबाबदार महापालिकेच्या ठेकेदारांवर कारवाई करावीच शिवाय त्याला महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. अधिकारी भ्रष्टाचारी असल्याने रस्ते खराब झाले असून, नगर अभियंता, उपनगर अभियंता अशा अधिकाऱ्यांच्या खासगी मिळकती शासकीय नियमांप्रमाणे जाहीर कराव्यात. जर अशा मिळकती जाहीर केल्या नाहीत, तर शिवसेना या अधिकाऱ्यांच्या मिळकतींबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करील, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली. शहरातील एकही रस्ता चांगला झाला नाही, त्यावर अधिकाऱ्यांचे योग्य नियंत्रण राहिलेले नाही, ठेकेदारांची मनमानी चाललेली आहे, असा आरोप पवार यांनी केला असता आयुक्त बिदरी यांनी ठेकेदाराला स्थानिक लोक दमदाटी करतात मग ठेकेदार कसे काम करतील, असा सवाल केला. कोण दमदाटी करतात त्यांच्यावर फौजदारी करावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. पालिकेतील निष्क्रिय अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता व योग्यता तपासून त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीची चौकशी करावी, अलीकडे वर्षभरात ज्या रस्त्यांचे काम खराब झाले, अशा रस्त्यांची आयुक्तांनी स्वत: पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशा मागण्याही केल्या. शिष्टमंडळात संजय पवार यांच्यासह नगरसेवक संभाजी जाधव, दत्ताजी टिपुगडे, रवि चौगुले, दिलीप पाटील-कावणेकर, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, संजय जाधव, राजेंद्र पाटील, दिलीप देसाई, आदींचा समावेश होता.
जबाबदार अधिकाऱ्यांची प्रॉपर्टी जाहीर
By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST