कोल्हापूर : महापूर, कोरोनासारख्या नकारात्मक बाबींचा ताण मागे सारून भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आमगनाला आता फक्त एक दिवस राहिल्याने बाजारपेठेत सजावट व पूजेच्या साहित्य खरेदीला उधाण आले आहे. दिवाळीनंतर तब्बल आठ महिन्यांनी रस्त्यावर एवढी गर्दी आणि नागरिक व बाजारपेठेत अमाप उत्साह दिसून आला. दुसरीकडे घराघरांत आरासाच्या मांडणीची लगबग सुरू आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पांचा गणेशोत्सव उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. बाप्पांच्या आगमनासाठी एक दिवस राहिल्याने आता बाजारपेठेत मखर, आसन, विद्युतमाळा, झुरमुळ्या, फुलांच्या माळा, वेली, झुंबर, तोरण, पडदे अशा साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, कटलरी मार्केट, मिजरकर तिकटी, टिंबर मार्केट, राजारामपुरी या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे तर जोतिबा रोड अंबाबाई मंदिर परिसर, बिनखांबी गणेश मंदिर येथे पूजेच्या साहित्यांची रेलचेल आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.
दुसरीकडे घराघरांत सजावट, आरासाच्या साहित्यांची मांडणी सुरू झाली आहे. गेल्यावर्षी सांभाळून, जपून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढून ते स्वच्छ करणे, त्यातील खराब झालेले साहित्य बाजूला काढून यंदाची आरास कशी करायची यावर चर्चा सुरू आहे. काही घरांमध्ये तर मांडणीही पूर्ण झाली आहे.
----
सूचनांचे पालन करा : प्रशासनाचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना, आदेशांचे पालन करून सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. नागरिकांनी व मंडळांनी एक दिवस आधीच गणेशमूर्ती न्यावी म्हणजे गर्दी होणार नाही. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाणे येथील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी वेळ निश्चित करावी, त्यासाठी सोबत मोजकेच कार्यकर्ते न्यावेत. आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहे तसेच या काळात ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
आज हरितालिका
गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत केले जाते. कुमारिका व सुवासिनी महिला हे व्रत करतात. यानिमित्त .
बाजारपेठेत गणेश, पार्वतीच्या मूर्ती, शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी बारीक वाळू, पडवळ, बेल-पत्री, धूप, अगरबत्ती अशा पूजेच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड यासह बाजारपेठेत महिलांची गर्दी होती.
---
फोटो नं ०८०९२०२१-कोल-आले गणरा०१, ०३
गणेशोत्सवाला एक दिवस राहिल्याने बुधवारी कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिरात श्रींच्या मूर्तीचे रंगकाम सुरू होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---
०३
गणेशोत्सवानिमित्त बिनखांबी गणेश मंदिराची रंगरंगोटी सुरू होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०२
आज गुरुवारी हरितालिका व्रत असल्याने पार्वतीची मूर्ती व बेलपत्रीची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ
---
०४
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांकडून मांडव उभारणी सुरू आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)