कोल्हापूर : निवडणुकीचे निकाल बदलण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच उमेदवारांच्या महिला आघाडीनेही प्रचाराची धुरा सांभाळली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले आमदार सतेज पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी प्रतिमा पाटील या महिला मेळावे, सभांमधून त्यांची भूमिका मांडत आहेत. त्यांनी गृहिणी महोत्सवाद्वारे महिलांचे संघटन केल्याने महिला मतदारांना साद घालण्यात त्या यशस्वी होत आहेत. तसेच पाटील यांचे ज्येष्ठ बंधू संजय डी. पाटील, मेहुणे निशांत, पुतणे ऋतुराज व पृथ्वीराज प्रचारात उतरले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक हे भाजपच्यावतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पत्नी शौमिका, भावजय अरूंधती, आई मंगल, भाऊ स्वरूप हे प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार विजय देवणे यांच्या प्रचारासाठी पत्नी प्रतिभा, मुलगा अभिषेक आणि सून श्वेता यादेखील मतदारांना साद घालीत आहेत. उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांनी ‘भगिनी मंच’च्या माध्यमातून महिलांचे संघटन केल्याने त्याही महिला मेळावे आणि सभांमधून क्षीरसागर यांची भूमिका मतदारांपुढे मांडत आहेत. त्यात त्यांचा मुलगा ऋतुराज यानेही जोमाने वडिलांचा प्रचार करायला सुरुवात केली आहे. येथूनच निवडणूक लढवीत असलेले भाजपचे उमेदवार महेश जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी आरती जाधव, मुलगी ऐश्वर्या, बहीण छाया यादव, भावजय नीता जाधव, सुषमा जाधव, रत्नमाला पोतदार यादेखील भागाभागांतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यासाठी त्यांचे वडील शिवाजीराव कदम, पत्नी व भाऊदेखील प्रचार करीत आहेत. प्रचारात भाजपची आघाडीकोल्हापूर : जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत काटाजोड लढती होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रचारात रंगत भरली आहे. जाहीर प्रचारासाठी आता केवळ पाचच दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक मतदारसंघात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी पदयात्रा, जाहीर सभांचा सपाटा लावला आहे. पदयात्रांबरोबरच दिवसा व रात्रीच्या भोजनावळींनाही जोर चढला असून, मतदारही अशा भोजनावळींचा मनमुराद आनंद लुटत आहेत. अशा भोजनावळी रोखण्यात शासकीय यंत्रणा मात्र अपयशी ठरत आहे. दहाही मतदारसंघांत चौरंगी, पंचरंगी परंतु काटाजोड लढती होत आहेत. गटातटांपासून नाराज होऊन बाजूला गेलेल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपली कार्डे खुली केली असल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारांचा जाहीर प्रचार सकाळी आठ वाजता पदयात्रेने सुरू होतो, तो सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतो. पदयात्रांद्वारे मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर उमेदवारांचा भर आहे. सायंकाळनंतर प्रचारसभा सुरू होतात. कोल्हापुरात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, स्मृती इराणी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांच्या सभा घेतल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही येथे सभा घेतली. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही उद्या, गुरुवारी सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, आदी नेतेही कोल्हापुरात येत आहेत. पदयात्रांच्या निमित्ताने गावागावांत शक्तिप्रदर्शन सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या दिमतीला वाहने पुरविण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील वडाप बंद पडले असून जनतेची त्यामुळे गैरसोयही होत आहे. ग्रामीण भागात राजकीय पक्षांच्या पताका, झेंडे यांनी गावेच्या गावे रंगीबेरंगी होऊन गेली आहेत. अनेक गावांत उमेदवारांचे डिजिटल फलकही झळकले आहेत. झेंडे, पताका लावण्याबाबतच्या नियमांचे पालन कोणी के ले नसल्याचे दिसते.हळदी-कुंकू, वाढदिवस यांचे निमित्त काढून भोजनावळींचा रतीब सुरू आहे. दररोज कोणाचा तरी वाढदिवस होतो आणि हजारो लोक आनंद लुटत आहेत. आवडीनुसार मानपानाची सोयही असते. (प्रतिनिधी)
प्रचारात उतरला उमेदवारांचा गोतावळा
By admin | Updated: October 9, 2014 00:47 IST