कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय मंडळाबाबत आज, मंगळवारची सुनावणी पणन संचालक नसल्याने होऊ शकली नाही. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांना निलंबित केल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. माने यांचे निलंबन अशासकीय मंडळाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शासनाने आॅगस्टमध्ये बाजार समितीच्या प्रशासकांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. या विरोधात शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार (भुयेवाडी) व भीमराव पाटील (केर्ले) यांनी पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. ज्यांच्या कर्तृत्वाने बाजार समितीवर प्रशासक आले त्यांनीच पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी ‘अशासकीय’ नावाखाली कारभार हातात घेतला आहे. ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याची तक्रार कृष्णात पोवार व पाटील यांनी केली होती. यावर पणन संचालक डॉ. माने यांनी संबंधितांना नोटिसा लागू करून आज सुनावणी ठेवली होती; पण गेल्या आठवड्यात डॉ. सुभाष माने यांनाच शासनाने निलंबित केले. त्यामुळे आज नेमकी सुनावणी कोण घेणार, हा प्रश्न होता. ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार आहे, तेही गैरहजर राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही. यासंबंधीचे तक्रारदार कृष्णात पोवार, भीमराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील हे सुनावणीसाठी पणन संचालकांच्या पुणे येथील कार्यालयात हजर राहिले; पण अधिकारीच उपस्थित नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)सुभाष माने ‘मॅट’मध्ये?‘आक्रमक अधिकारी’ म्हणून डॉ. सुभाष माने यांच्याकडे पाहिले जाते. सेवेत असताना थेट मंत्र्यांना अंगावर घेणारे ते एकमेव अधिकारी आहेत. मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले म्हणून त्यांची उचलबांगडी केली होती. याविरोधात ‘मॅट’मध्ये जाऊन ते पुन्हा पणन संचालक बनले. निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसने बाजार समित्यांवरील प्रशासक हटवून अशासकीय मंडळांच्या नियुक्त्या केल्याने माने पुन्हा आक्रमक झाले होते. ते पुढील कारवाई करणार तोपर्यंत त्यांना निलंबित केल्याचे बोलले जाते. या विरोधातही ते ‘मॅट’मध्ये गेल्याचे समजते.
माने यांच्या निलंबनामुळे सुनावणी लांबणीवर
By admin | Updated: September 10, 2014 00:28 IST