कोल्हापूर : लाईन बाजार येथील डंपिंग मैदानावरील गेल्या अनेक वर्षांपासून साचून राहिलेला दोन लाख क्युबिक मीटर कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात महानगरपालिका आरोग्य विभागास यश आले. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न काहीसा सुटला आहे. त्याठिकाणी अजूनही जवळपास अडीच लाख क्युबिक मीटर कचरा शिल्लक असून त्यावर प्रक्रिया करण्यास संबंधित ठेकेदारास ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
लाईन बाजार परिसरात असलेल्या डंपिंग मैदानावर गेल्या अनेक वर्षापासून दैनंदिन घनकचरा टाकला जातो. रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्मितीचा प्रयोग ‘झूम’ ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आला होता. परंतु कंपनीने काही महिने हा प्रकल्प व्यवस्थित चालविला. काही वर्षांनी या खताची मागणी कमी झाली. कंपनीला नुकसान व्हायला लागले. त्यामुळे कंपनीने काम बंद केले.
तरीही महानगरपालिका प्रशासनाने शहरातील कचरा आणून टाकण्याचे कार्य तसेच सुरु ठेवले. मैदानावर कचरा टाकायला जागा मिळत नव्हता. तेथे कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले. या साचलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने निर्गत करण्याचा ठेका पुण्याच्या कंपनीला देण्यात आला. या कंपनीने पहिले दीड वर्ष आर्थिक अडचणीमुळे प्रकल्प सुरु केला नाही. ठेका घेतल्यानंतर दीड वर्षांनी प्रकल्प सुरु केला. त्यातून खत निर्मिती, ऊर्जा निर्मिती सुरु केली. कालांतराने हाही प्रकल्प बंद झाला. सध्या टी. एस. जाधव नावाच्या ठेकेदाराने हा प्रकल्प चालविण्यास घेतला आहे.
पॉईंटर -
- एकूण साचलेला कचरा - ४ लाख ३८ हजार क्युबिक मीटर.
- पैकी १ लाख ८५ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया.
- प्रक्रिया झाल्याने २२ हजार चौ. मीटर जागा झाली मोकळी
- शिल्लक कचऱ्याची निर्गत करण्यास दि. ३१ मे २०२१ पर्यंत मुदत
- कचरा उठाव काम मात्र रेंगाळले
शहरातील कचरा उठावाचे काम मात्र सध्या रेंगाळले आहे. अकरा पैकी दोनच आर.सी. वाहने उपलब्ध असणे, ॲटोटिपरची संख्या कमी असणे, टिपर चालकांचा संप अशा विविध कारणांनी दैनंदिन कचरा उठावाचे काम विस्कळीत झाले आहे. कचरा कंटेनर काढण्यात आले आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या कामावर परिणाम झाला आहे.