शिरोली : टोप गावाने जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून दिले होते, आता आमदार झालो असलो, तरी टोप गावाला कधीही विसरणार नाही. गावच्या विकासासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे उद्गार आमदार अमल महाडिक यांनी काढले. टोप येथील विविध विकासकामांचा प्रारंभ व सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.आमदार महाडिक म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य असताना टोप गावच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. प्रामुख्याने टोपच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सुरू आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, बाजारकट्टा, बिरदेव मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह यासारखी अनेक विकासकामे केली आहेत आणि आता तर सर्वांच्या आशीर्वादाने मला आमदार केले आहे.यावेळी महामार्गालगत २५ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या बाजारकट्टा, बिरदेव मंदिर येथे सांस्कृतिक सभागृहाच्या पायाखुदाई, गणेश तरुण मंडळाच्या व्यायामशाळेचे उद्घाटन यावेळी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीच्यावतीने महाडिक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच धनश्री पाटील, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी कांबळे, उपसरपंच आनंदा भोसले, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, नीतेश नलवडे, सचिन पाटील, अरुण गायकवाड, आदी उपस्थित होते.
टोपच्या विकासासाठी प्राधान्य : महाडिक
By admin | Updated: December 27, 2014 00:03 IST