इचलकरंजी : शहरातील पाच सूत व्यापारी व एका कापड ट्रेडिंग कंपनीवर विक्रीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकून त्यांच्याकडील खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी केली. एकाचवेळी सहा ठिकाणी छापे पडल्याने शहरातील सूत व कापड बाजारात खळबळ उडाली आहे.शहरामधील कापड मार्केट, हुलगेश्वरी रोड, डॉ. साखरपे दवाखाना परिसर आणि रिंग रोड अशा ठिकाणी असलेल्या पाच सूत व्यापाऱ्यांवर विक्रीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे येऊन त्यांनी त्यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला. त्यांच्याकडील सूत खरेदी व विक्रीसाठी असलेली कागदपत्रे आणि त्याच्याशी संबंधित असलेली बिल बुके व खतावण्या यांची पडताळणी दिवसभर सुरू केली होती. पाचही सूत व्यापारी परराज्यातील सूतगिरण्यांमधून सूत मागवून त्याची विक्री करणारे आहेत. तसेच हे सर्व सूत व्यापारी इचलकरंजी व मालेगाव या दोन्ही यंत्रमाग केंद्रांमध्ये सूत विक्रीचा व्यवसाय करणारे असल्याची चर्चा आहे.याचबरोबर येथील औद्योगिक वसाहतीमधील कल्याण केंद्र परिसरात असलेल्या एका कापड ट्रेडिंगच्या फर्मवरसुद्धा विक्रीकर खात्याच्या पथकाने छापा टाकला. त्यांच्याकडील खरेदी-विक्री आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या अन्य व्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी दिवसभर करण्यात आली. याचबरोबर सूत व्यापाऱ्यांकडून वापरात येणाऱ्या दोन गोदामांवरसुद्धा या पथकाचे कर्मचारी दिवसभर ठाण मांडून होते. त्यामुळे गोदामातून सुताची होणारी आवक-जावक ठप्प होती. (प्रतिनिधी)उलाढाल कोट्यवधीची : महसूल मात्र शून्यइचलकरंजी येथील काही सूत आणि कापड व्यापारी परराज्यातील सूतगिरण्यांमधून सूत मागवून त्याची विक्री करतात. ते इचलकरंजीसोबतच मालेगाव येथील यंत्रमाग केंद्रांमध्येही सूतविक्रीचा व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी त्या प्रमाणात शासनाला महसूल मिळत नसल्यामुळे हे छापे टाकण्यात आल्याचे समजते.
पाच सूत व्यापाऱ्यांवर विक्रीकर खात्याचा छापा
By admin | Updated: July 8, 2016 00:56 IST