कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वतीने सुरू असलेल्या आंदाेलनाची गुरुवारी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दखल घेतली. त्यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
पुनर्वसनासह न्याय्य मागण्यांसाठी १ मार्चपासून श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. याची दखल घेत प्रधान सचिवांनी आंदोलकांच्या मागण्या, तसेच पुनर्वसनाच्या स्थितीबाबत माहिती मागवून घेतली. या माहितीच्या व निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व पाटबंधारे आणि संबंधित सर्व अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांना दिले.
यामुळे उत्साहाचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात निवेदनातील मुद्यांची सोडवणूक होऊन पदरात पडत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
--