कोल्हापूर : येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील चार विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश मिळवले आहे. यूपीएससीने २०१३-१४ या वर्षात घेतलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील अमोल जगन्नाथ येडगे (मूळ रा. यशवंतनगर, कऱ्हाड) याने २५४ वा, विजय राम नेटके (रा. कोळेवाडी, बीड) याने २६९ वा, तर मयूर रतिलाल गोवेकर (रा. लोणंद, सातारा) याने ३४७ वा क्रमांक पटकाविला. तसेच सध्या इंडियन रेव्हीन्यू सर्व्हिसेसमध्ये सेवेत असलेले इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील मोतीलाल सहदेव शेटे यांनी ९५५ वा क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा मे २०१३ मध्ये दिली होती, तर मुख्य परीक्षा डिसेंबर २०१३ मध्ये दिली होती. त्यानंतर मे २०१४ मध्ये झालेल्या मुलाखतींच्या अंतिम फेरीतून आज, गुरुवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये त्यांनी यश मिळवले. या केंद्रातून आतापर्यंत ३१ विद्यार्थी भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले आहेत. केंद्रात दरवर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अशा पद्धतीची प्री-आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटर्स महाराष्ट्रात फक्त सहा ठिकाणी आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची पहिली पसंती कोल्हापूर सेंटरला मिळत आहे.
प्री-आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटरच्या चौघांचा झेंडा
By admin | Updated: June 13, 2014 01:45 IST