गडहिंग्लज : कवी ज्या समाजात जगतो, जे वास्तव पाहतो त्यातूनच त्याची कविता घडत असते. जी कविता माणसांच्या जगण्याच्या वेध घेते, ती चिरकाल टिकणार असते, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. समाजवादीच्या गडहिंग्लज शाखेच्यावतीने आयोजित प्रबोधन कवि संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.प्रबोधिनीसह अक्षरभारत वाचनालय ऐनापूर आणि कित्तूरकर ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कवी संमेलनात प्रा. किसनराव कुराडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील कविता सादर केली. तत्पूर्वी दिवंगत कवी अरूण काळे यांच्या ‘तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा’ या कवितेने संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रा. पी. डी. पाटील, विलास माळी, श्रद्धा पाटील, आदींसह के. बी. केसरकर, डॉ. स्मिता मुजूमदार, रावसाहेब मुरगी, अनिल कलकुटगी, सदानंद शिंदे, अश्विनी पाटील आदींनी कविता सादर केल्या.प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. प्रा. नीलेश शेळके यांनी सूत्रसंचलन केले. प्रबोधिनीच्या गडहिंग्लजचे अध्यक्ष सुरेश पोवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कविता जगण्याचा वेध घेते : प्रसाद कुलकर्णी
By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST