साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा हा अव्यवहार्य कल्पनांवर आधारलेला नसावा. फोट्रेस कंपनीने यापूर्वी २०११ मध्ये १२० कोटी रुपयांचा सादर केलेला प्रस्ताव पुन्हा नव्याने जसाच्या तसा २०१४ मध्ये २५५ कोटींचा केला आहे. विकास करताना हे मंदिर गावठाणात आहे याचे भान हवे. प्रस्तावात बाधित होणारे रहिवासी व व्यापाऱ्यांची संख्या कमी दाखविली आहे. (३० रहिवासी व १०८ व्यापारी कुळे व मालक धरून) प्रत्यक्षात या ठिकाणी ३०० हून अधिक लहान-मोठी घरे व २९३ च्या आसपास लहान-मोठ्या दुकानांचा समावेश आहे. या साऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे. तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ हेतू हा देवीच्या माहात्म्याबरोबरच स्थानिकांचे राहणीमान उंचावणे व व्यवसायाला चालना देणे हाच असला पाहिजे; परंतु स्थानिक रोजगार उद्ध्वस्त करून असा विकास करणे म्हणजे मूळ हेतूला बगल दिल्यासारखे होईल. मंदिर विकास आराखड्याच्या निमित्ताने शहराशी संलग्न प्रेक्षणीय स्थळांचा विकास, स्थानिकांचे राहणीमान व रोजगार या घटकांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. केवळ प्रशासकीय पातळीवर आराखडा न बनविता सर्व घटकांना विश्वासात घेऊन समाजाभिमुख आराखडा बनवावा. - समीर नदाफ , सरचिटणीस, कोल्हापूर जनशक्ती संघटनामहापालिकेच्या बंद शाळांचा वापर करावाटेंबलाई मंदिराजवळ भक्त निवासाची उभारणी करणे हे पूर्णपणे अव्यावहारिक व भाविकांच्या गैरसोयीचे आहे. याचा सारासार विचार करून शहरातील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांचा विकास करावा व त्या ठिकाणी भक्त निवासाची व्यवस्था करावी. बहुमजली पार्किंगची गरजबहुमजली पार्किंगची आत्यंतिक गरज आहे. बिंदू चौक व व्हीनस कॉर्नर या ठिकाणी करून पार्किंगची समस्या सोडवावी. भवानी मंडप ते बिंदू चौक मार्गावर हेरिटेज वॉक करण्यात येणार आहे. मात्र येथे दुतर्फा रहिवासी आहे. शिवाय सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय संघटनांची कार्यालये आहेत. हा आराखडा बनवीत असताना महिला भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारणीसाठी कोणतीही तरतूद दिसत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाचा प्राधान्याने विचार व्हावा.
आराखड्यात व्यावहारिक दृष्टिकोन हवा
By admin | Updated: June 13, 2016 00:35 IST