एकनाथ पाटील - कोल्हापूर --व्हॉटस अॅप, फेसबुकच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रबोधनावर भर दिला आहे. ‘नो डॉल्बी, नो दारू’ असा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत आणि प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचविण्याचा मानस प्रशासनाचा आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सोशल मीडियाच्या साथीने पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. कोल्हापूर शहरातील तालीम, तरुण मंडळांनी डॉल्बी व दारुमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इचलकरंजीतील काही मंडळांनी डॉल्बी लावणारच अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी डॉल्बी बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. शर्मा यांनी पोलीस ठाण्यांंतर्गत मंडळांच्या बैठका घेतल्या. डॉल्बीचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांच्या पोस्टर्सचे वाटप करण्यात आले.पर्यावरण संरक्षणानुसार कारवाई -डॉल्बीचा वापर करतील त्यांच्यावर व डॉल्बी पुरविणारे चालक, मालक, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली आहे. त्या वाहनाचे चालक, मालक, आदींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. -त्यामध्ये पाच वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पासपोर्ट, शासकीय, निमशासकीय नोकरीस हजर होताना अडचणी निर्माण होऊन बहुसंख्य तरुणांच्या भविष्याचे नुकसान होऊ शकते.छेडछाडविरोधी पथक पोलीस दलातर्फे प्रत्येक मार्गावर व चौकात ध्वनी प्रदूषण विरोधी पथक नेमण्यात येणार आहे. तसेच शहरात हुल्लडबाज व टवाळखोर व्यक्तींकडून महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांचे छेडछाड विरोधी पथकही सतर्क असणार आहे. उत्सव कालावधीत जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मानवी शरीरावर गंभीर परिणाम-कायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. -त्यामध्ये वृद्ध, नागरिक, लहान बालके, गर्भवती स्त्रिया, मानवी श्रवणयंत्रणा, रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू असे आजार होण्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. -त्यामुळे यंदाही डॉल्बी विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व मंडळांना पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे.बुधवारी बैठक -गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी बुधवारी (दि. १३) सार्वजनिक गणेश मंडळांची सामूहिक बैठक पोलीस मुख्यालयात आयोजित केली आहे.या बैठकीत मंडळांना मार्गदर्शन केले जाणार आसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.
प्रबोधनाने ‘नो डॉल्बी, नो दारू’
By admin | Updated: August 12, 2014 00:46 IST