कोल्हापूर : जिल्ह्यातील ९० हजार ६१० कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सध्या ६९ कोटी ५४ लाखांचे चालू वीजबिल व ३७१ कोटी १८ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. थकबाकीमुक्त योजनेनुसार येत्या मार्चपर्यंत यातील ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित ५० टक्के थकीत रक्कम माफ होणार आहे. मात्र योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ७८ हजार ५३० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ७५ कोटी २० लाख व चालू वीजबिलांचे ३७ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनाद्वारे मिळालेली सूट, तसेच विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ९१ कोटी ६१ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ५४ हजार ८९६ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिल व थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ७५ कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा केला आहे, तर ५८ कोटी ४१ लाख रुपयांची अतिरिक्त सूट घेऊन संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
गेल्या मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरुवात केली. या धोरणातील योजनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ४५ हजार ५०६ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे ४२९ कोटी ५९ लाख सुधारित थकबाकी आहे. यातील ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचे ८६ कोटी ५५ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ होणार आहे.