कोल्हापूर : सोलापूर येथील तत्कालिन केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या पॉवर ग्रीड प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. दुसरीकडे मात्र, सुशीलकुमार शिंदे यांच्याच हस्ते भूमिपूजन झालेल्या कोल्हापुरातील कळंबा पॉवर ग्रीड प्रकल्पाच्या कामाची गती अजूनही धिमीच असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती घेतली असता ही बाब निदर्शनास आली. गेल्या सहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाला नेमका मुहूर्त लागणार कधी? अशी विचारणा सर्वसामान्यांमधून होत आहे.कळंबा (ता. करवीर) येथे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडतर्फे पॉवर ग्रीड स्टेशनच्या कामाचे शानदार उद्घाटन ११ एप्रिल २००८ रोजी तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी तत्कालिन खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह मंत्री, आमदार व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन आॅफ इंडिया लिमिटेडतर्फे ७६५ के.व्ही. क्षमतेचा एच. वी. डी. सी. बॅक टू बॅक अप स्टेशन सोलापूरनंतरचे राज्यातील कोल्हापूर हे महत्त्वाचे स्टेशन ठरणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला ४०० के.व्ही. विजेच्या पर्यायासह नॅशनल पॉवर ग्रीडशी थेट जोडला जाणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प आपल्या गावात होणार असल्याने कळंबा ग्रामस्थांनी गायरानमधील २६५ एकर जमिनींपैकी ६० एकर जमीन या प्रकल्पास दिली. पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशनने शासनाच्या दराप्रमाणे दोन कोटी १३ लाख रुपये राज्य महसूल विभागाकडे वर्ग केले. गेल्या सहा वर्षांपासून या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता व प्रकल्पाच्या ठिकाणी संरक्षण भिंत वगळता ठोस असे कोणतेही काम झालेले दिसत नाही. किरकोळ स्वरूपात या ठिकाणी काम सुरू असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत होते; परंतु त्याचीही गती मंदावल्याचे दिसत आहे.या संदर्भात ‘पॉवर ग्रीड’चे कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक व अप्पर व्यवस्थापक यांच्याशी गोवा येथील कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. विजेसाठी सक्षम पर्यायजिल्ह्याचे तळंदगे हे पॉवर सबस्टेशन सध्या दाभोळ-कऱ्हाड-कोल्हापूर असे कोकणाशी जोडलेले आहे. कळंबा पॉवर ग्रीडमुळे जिल्हा सोलापूर-कळंबा-तळंदगे असा थेट नॅशनल ग्रीडशी जोडला जाईल. दाभोळ वीज प्रकल्पामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास जिल्ह्याला ४०० के.व्ही.चा दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असे सूत्राकडून सांगण्यात आले.
कळंबा पॉवर ग्रीड कागदावरच
By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST