सचिन भोसले ल्ल कोल्हापूरवीज गळती, वीज वाहिनी तुटणे, फीडर बंद पडणे, आदी बिघाड शोधण्यासाठी होणारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची पळापळ आता संपणार आहे. कंपनीने कार्यालयातूनच बिघाडाचे अचूक ठीकाण शोधणारी पर्यवेक्षक नियंत्रण आणि माहिती संकलन करणारी यंत्रणा (सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अॅक्वेझेशन सिस्टीम) कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा रिमोटद्वारे नियंत्रित असून, राज्यातील मोजक्याच जिल्ह्यात कार्यान्वित होणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून महावितरणने कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचाही समावेश केला आहे. वीज वाहिन्या बिघाडाचे निश्चित कारण लवकर न सापडल्याने दुरुस्तीस विलंब होतो व याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो. यात व्यावसायिकांना व शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. हे सर्व टाळण्यासाठी महावितरणने स्काडाज ही यंत्रणा उभी केली आहे. यातून बिघाड कोठे झाला आहे. याचे अचूक ठिकाण व तेथे सुरू असणारा वीज दाबही कळणार आहे. एकाच ठिकाणाहून नियंत्रण होणार असल्याने ही यंत्रणा म्हणजे महावितरणचे अत्याधुनिकतेकडे एक पाऊलच म्हणावे लागेल. या यंत्रणेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित अभियंता वर्ग आणि कर्मचारी वर्गही नियुक्त केला आहे. तसेच या यंत्रणेकरिता स्वतंत्र इमारतही ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात बांधण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे अपुऱ्या मनुष्यबळातही ग्राहकांना सेवा देता येणार आहे. कोणत्याही वार्डात किंवा विभागात वीज वाहिनीत बिघाड झाल्यास संपूर्ण परिसरातील वीज बंद करावी लागत होती. याशिवाय बिघाड झालेल्या ठिकाणी वीज बंद न करतानाही वायरमन जीव धोक्यात घालून वीज ट्रॉन्स्फॉर्मर किंवा खांबावर चढत होते. त्यामुळे उच्च दाब असलेल्या या खांबावर एखादी चूकही वायरमनच्या जिवावर बेतत होती. हे सर्व टाळण्यासाठी या यंत्रणेचा मोठा उपयोग होणार आहे.
वीज बिघाड आता दिसणार स्क्रीनवर
By admin | Updated: June 29, 2014 00:48 IST