कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने आता इच्छुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. संघाच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि विद्यमान उपाध्यक्ष संजय खद्रे यांच्यात चुरस रंगणार आहे. त्यात उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन उमेदवार रिंगणात आहेत, तर संचालकपदाच्या बारा जागांसाठी सतरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांची संघटना असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक येत्या गुरुवारी (दि. ९) होत आहे. यंदा संघाचे अध्यक्षपद महाराष्ट्रीयन माणसासाठी राखीव आहे. त्यासाठी सुरेश गायकवाड व संजय खद्रे यांनी आपला दावा सांगितला आहे. गायकवाड यांनी यापूर्वी दोनवेळा संघाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, अशी काही सभासदांची मानसिकता आहे. त्या दृष्टिकोनातून खद्रे यांनी आपला प्रचार वेगाने सुरू केला आहे. सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत संघाच्या हितासाठी त्यांनी आजवर केलेले काम याची माहिती ते देत आहेत. गायकवाड यांनीही प्रचारास सुरुवात केली आहे. उपाध्यक्षपदी राजस्थानी सभासदाची निवड होणार असल्याने यासाठी हितेश ओसवाल, गणपतसिंह देवल, राजेश राठोड हे रिंगणात उतरले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपद सोडून संघाच्या कार्यकारिणीवर १२ संचालकांची निवड केली जाते. हे बाराही संचालक सभासदांतूनच निवडले जातात. त्यातील नऊ सभासद राजस्थानी, तर आठ सभासद महाराष्ट्रीयन असतात. संचालकपदासाठी १७ जण रिंगणात उतरले आहेत. संघाचे माजी अध्यक्ष रणजित परमार आणि विरोधक यांच्यात वार्षिक सभेत झालेल्या आरोप- प्रत्यारोपांमुळे संघाचे कामकाज आणि अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला. पूर्वी संघाची निवडणूक लागली कधी आणि झाली कधी हेही कळायचे नाही; मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. त्याचा निकाल १० आॅक्टोबरला जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)९ आॅक्टोबरला होणार निवडणूकसंचालक पदाच्या एकूण १२ जागांसाठी १७ उमेदवारांचे अर्ज दाखलयंदा अध्यक्षपद महाराष्ट्रीयन सभासदासाठी, तर उपाध्यक्षपद राजस्थानी सभासदासाठी राखीवबारा संचालक पदांपैकी नऊ संचालक राजस्थानी, तर आठ संचालक महाराष्ट्रीयन अध्यक्षपदासाठी सुरेश गायकवाड तिसऱ्यांदा रिंगणात सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर उमेदवारांचा जोर ---- १० आॅक्टोबरला मतमोजणी
उपाध्यक्ष पदासाठी तिघेजण रिंगणात
By admin | Updated: October 6, 2014 23:43 IST