अविनाश बाड -आटपाडी दोन-तीन दिवसांपासून आटपाडीत डाळींब खरेदीसाठी देशभरातून व्यापाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन त्यांची संख्या शंभरावर गेली आहे. प्रथमच व्यापारी विक्रमी संख्येने एकाचवेळी दाखल झाल्याने डाळिंबाला पुन्हा तेजीचे दिवस आले. फुटलेली डाळिंबे कचऱ्यात फेकून देण्याऐवजी आता ती मुंबईच्या फूटपाथवर दिसणार आहेत. नाशिक, पुणे, बारामतीच्या ज्युस व्यापाऱ्यांनीही एकाच दिवसात फुटकी चार ट्रक डाळिंबे प्रथमच आटपाडीतून खरेदी केली आहेत. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आता कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे. पिढ्यान्पिढ्यांच्या दुष्काळावर मात करून आणि कष्टाच्या जोरावर शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार डाळिंबांची निर्मिती केली. पण, केंद्र शासनाने निर्यातीवर जाचक अटी लादल्याचे आणि थंडीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी डाळिंबाचे दर पाडले होते. आतापर्यंत अवघे २० ते २५ व्यापारीच आटपाडीत डाळिंबाची खरेदी करत होते. डाळिंबाचा ‘भगवा’ वाण ४० ते ५० रुपयांपर्यंत विकला जात होता. ‘लोकमत’ने दि. ५ जानेवारीपासून डाळिंबाच्या कमी दरासह शेतकऱ्यांचे दुखणे मांडले. परिणामी, जिल्ह्यातील अडतदारांनी देशभरातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून आटपाडीतील डाळिंबाची आवक आणि आताचे खरेदी दर सांगितले. त्यामुळे सध्या पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, दिल्ली, मुंबई, मदुराई, चेन्नई, मद्रास, लखनौ आणि कर्नाटकातून १०० हून अधिक व्यापारी खरेदीसाठी आले आहेत. त्यामुळे ५० रुपयांपर्यंत विकला जाणारा ‘भगवा’ वाण आता ८३ रुपये किलोपर्यंत गेला आहे. गत आठवड्यात १५ ते २५ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या ‘गणेश’ या वाणाची डाळिंबे आता २५ ते ४० रुपये दराने विकली जात आहेत. फूटपाथवर विक्री करण्यासाठी मुंबईहून प्रथमच येथे आलेले व्यापारी ही उलकी डाळिंबे २५० ते ४०० रुपये प्रतिक्रेट दराने खरेदी करू लागले आहेत. जेजुरी, नाशिक, बारामती येथील ज्युस उत्पादकांनी आटपाडीत येऊन ‘ज्युस’ निर्मितीसाठी ५० रुपये ते ५०० रुपये क्रेट या दराने उलकी डाळिंबे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे २० टन डाळिंबे एका दिवसात विकली गेली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना सुमारे चार लाख रुपये मिळतील. डाळिंबांची खरेदी करण्यासाठी परराज्यातील व्यापारी दलाल नेमू लागले आहेत. आठ-पंधरा दिवसांत डाळिंबांचे दर पुन्हा शंभरावर जाण्याची शक्यता अडतदारांनी व्यक्त केली.ऐन हंगामात अन्न आणि औषध प्रशासनाने अनारदाना आणि ज्युस उद्योगांवर छापे टाकून ते उद्योग बंद पाडले. त्यामुळे आटपाडीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांची डाळिंबे कचऱ्यात फेकून द्यावी लागत होती. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार सडेतोड वृत्त दिले. त्याची व्यापाऱ्यांसह संबंधित व्यावसायिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यामुळे प्रथमच आटपाडीत चार-पाच व्यावसायिकांनी फुटलेली डाळिंब खरेदी करण्यास सुरुवात केली. आटपाडीच्या डाळींब व्यापारी अडत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ नागणे, अडतदार विठ्ठल सरगर आणि अडतदारांनी याबाबत ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
डाळिंबाला आले सुगीचे दिवस.... शासनाने मारले, ‘लोकमत’ने तारले !
By admin | Updated: January 17, 2015 00:07 IST