कुरूंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी सुस्त झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला व पाटबंधारे विभागाला ‘लोकमत’च्या दणक्याने अखेर जाग आली. आज, सोमवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढून तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे व दूषित पाणी प्रवाहित केले. तर करवीरचे प्रातांधिकारी पाटील यांनी याप्रश्नी बुधवारी (दि. २१) दुपारी बैठकीचे आयोजन केले. त्यामुळे पंचगंगाकाठावरच्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पंचगंगा नदीला दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मेल्याने शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. मेलेले मासे बंधाऱ्याला तटल्याने व दूषित पाणी तुंबून राहिल्याने पाण्याला उग्र वास येत होता. जलपर्णी, मेलेले मासे व दूषित पाणी वाहून जाण्यासाठी काही बरगे काढून पाणी वाहते ठेवण्याचा निर्णय झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समिती यांनी येथील नागरिकांच्या तीव्र भावनांचा अनुभव घेऊनही नदी प्रदूषणावर प्राथमिक उपाय म्हणून बरगे काढून पाणी वाहते ठेवणे गरजेचे होते, असे असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने व पाणी प्रदूषणाची तिव्रता वाढल्याने ‘लोकमत’ने प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शुन्य या मथळ्याखाली सोमवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्याच्या चार सांडव्याचे बरगे काढून पाणी वाहते केले. त्यामुळे या बंधाऱ्याला तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे वाहून गेले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून ‘लोकमत’च्या वृत्ताने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग आल्याने नागरिक, आंदोलनकर्ते व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांतून ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. (वार्ताहर)बुधवारी बैठकतेरवाड बंधाऱ्यावर आंदोलन होऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाईची हालचाल केले नसल्याचे ‘लोकमत’च्या वृत्ताने मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीचे अध्यक्ष करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांना फोनवरून याप्रश्नी निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. २१) दुपारी करवीर प्रांत कार्यालयात सर्व विभाग अधिकारी व आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाला अखेर जाग
By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST