लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जलदगतीने, सुरळीतपणे आणि विना गोंधळ लसीकरण व्हावे म्हणून कोल्हापूर शहरात मतदान केंद्रावर लसीकरण करण्यास परवानगी मागणारा महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा प्रस्ताव राज्य सरकारने नाकारला आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रयत्नांना खो बसला. सध्या अकरा नागरी आरोग्य केंद्रावर तसेच सीपीआर येथेच लस देण्यात येत आहे. तीच प्रक्रिया सुरु राहणार आहे.
कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. लस हाच त्यावरील एक प्रमुख उपाय असल्याची खात्री पटल्यामुळे शहरवासीय रोज लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यामुळे गोंधळ उडत आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
नागरिकांना विना सायास लस मिळावी, लसीकरणाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासक बलकवडे यांनी शहरातील ३५० मतदान केंद्रावर लस दिली तर गर्दी विभागली जाईल आणि लसीकरणाचे कामही सुरळीत होईल या अपेक्षेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे तसा प्रस्ताव पाठविला होता. परंतु हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.
लसीकरणाची क्षमता वाढविण्याची तयारी व यंत्रणा असली तरी लसीचा पुरवठा अनियमित होत आहे, पुरेशी लस मिळत नाही. शिवाय आरोग्य केंद्रातच लस देण्याचे नियम असल्याने अन्यत्र लस देता येणार नाही, असे आरोग्य विभागाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.