इचलकरंजी : नगरपालिकेच्या सभेमध्ये उपनगराध्यक्षांना सभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यावरून उडालेल्या गोंधळावरून राजकीय कुरघोड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. परिणामी स्मार्ट सिटी, शहराचा विकास, नागरी सेवा-सुविधांचा विषय बाजूला पडण्याची भीती व्यक्त होत आहे.सन २०११ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले. कॉँग्रेसने राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आघाडी केली आणि त्याप्रमाणे तीन वर्षे कारभार चालला. पहिल्या अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला असे आरक्षित झाले. नगराध्यक्षपदासाठी सहा नगरसेविका इच्छुक असल्याने प्रत्येकीला पाच महिने याप्रमाणे सहाही नगरसेविकांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरले. त्याप्रमाणे प्रथम शुभांगी बिरंजे नगराध्यक्षा झाल्या.नगराध्यक्षा बिरंजे यांचा कालावधी डिसेंबरमध्ये संपत असतानाच त्यांनी राजीनामा न देण्याचा पवित्रा घेऊन बंड केले. राजकीय कुरघोडी करण्याची संधी मिळाल्याने ‘शविआ’ ने व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने नगराध्यक्षांच्या बंडाला पाठिंबा दिला. नगराध्यक्षांना एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अविश्वास आणता येत नाही, असा कायदा असल्याने कॉँग्रेसनेही नंतर नगराध्यक्षांना सहकार्य करण्याचे ठरविले. नगराध्यक्षा बिरंजे यांचा एक वर्षाचा कालावधी १५ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने आठवडाभर आधीपासून अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे नगराध्यक्षा व ‘शविआ’च्या गोटामध्ये अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये नगराध्यक्षा सभागृहाबाहेर जाताना उपनगराध्यक्षांऐवजी ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव यांना सभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले. याचा जाब कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना विचारला आणि त्यावरून सभागृहामध्ये रणकंदन माजले. सभेमध्ये उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत नगराध्यक्षांनी सभा संपवून त्यावेळी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना पुन्हा जाब विचारला असता कॉँग्रेस व ‘शविआ’च्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडून धक्काबुक्की झाली.नगरपालिकेच्या सभेतील उडालेला गोंधळ आणि धक्काबुक्कीच्या प्रकाराबद्दल १६ जुलै रोजी नगराध्यक्षांनी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव व नगरसेवक भीमराव अतिग्रे यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणाचा अहवाल नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मागविला आहे. (प्रतिनिधी)विकास खुंटणार काय ?२९ जुलै रोजी उपनगराध्यक्ष जाधव व काँग्रेसचे पक्षप्रतोद पाटील यांनी नगराध्यक्षा बिरंजे, ‘शविआ’चे पक्षप्रतोद जाधव, कार्याध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पोवार, गटनेते महादेव गौड व मदन झोरे यांनी त्याच सभेमध्ये गोंधळ घातल्याबद्दल त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे. यामुळे आता राजकीय कुरघोड्यांना पुन्हा ऊत येणार का, अशीच चर्चा नागरिकांत आहे. अशा शह-काटशहाच्या राजकारणामुळे स्मार्ट सिटी आणि शहराचा विकास मागे पडतो की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
राजकीय कुरघोड्या पुन्हा सुरू
By admin | Updated: August 1, 2015 00:35 IST