ज्योतिप्रसाद सावंत - आजरा तालुक्यात विधानसभा निवडणुकानंतर झालेले राजकीय त्रांगडं पाहता येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या ‘गोकुळ’, जिल्हा बँक यांसह प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.तालुक्याच्या राजकारणावर पक्षीय पातळीवर राष्ट्रवादी व काँगे्रस, तर वैयक्तिक पातळीवर मुकुंद देसाई, अशोक चराटी, वसंत धुरे, रवींद्र आपटे, अंजना रेडेकर, विष्णुपंत केसरकर, जयवंत शिंपी, उदय पवार, सुधीर देसाई, उमेश आपटे या मंडळींचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे.विधानसभा निवडणुकीत यापैकी अनेकांनी सोयीच्या भूमिका घेतल्या. अशोक चराटी यांनी तर तीनही मतदारसंघांत वेगवेगळ्या भूमिका घेत तीनही आमदार आपल्या विचाराशी ‘सकारात्मक’ असतील अशी काळजी घेतली. या तीनमध्ये राधानगरी-भुदरगडमधील आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी त्यांनी लावलेली ताकद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांना अडचणीची आणणारी ठरली. यातच राष्ट्रवादी व चराटी यांचे बिनसले.सद्य:स्थितीत जिल्हा बँक निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. विद्यमान संचालक चराटी व शिंपी यांच्यात ही लढत होणार, हे स्पष्ट आहे. जयवंतरावांनी विधानसभेला तीनही राष्ट्रवादी आमदारांना पाठिंबा दिल्याने देसाई, धुरे, सुधीर देसाई, उदय पवार ही के.पीं.चा पराभव जिव्हारी लागणारी मंडळी जयवंतराव यांना पाठबळ देणार. त्यामुळे चराटी यांच्याबाबत के.पीं.चा विरोध राहिला तरीही मुश्रीफ काय निर्णय घेणार? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. शिंपी व चराटी या दोघांनीही नेटाने तयारी चालविली आहे. ‘गोकुळ’मध्ये विद्यमान संचालक रवींद्र आपटे यांचे स्थान भक्कम आहे. आपटेंना विरोधच करायचा तर विरोधात उमेदवार कोण? येथून विरोधकांना सुरुवात करावी लागणार आहे. आपटेंबाबत अनेकांची भूमिका सकारात्मक दिसत आहे. तालुका खरेदी-विक्री संघामध्ये मात्र धुमशान होणार आहे. यामध्ये काही संचालक चराटींचे नेतृत्व मानणारे, तर काही सुधीर देसाई, मुकुंद देसाई यांचा ‘शब्द’ मानणारे आहेत.निवडणुकांची मालिका सुरू राहणारतालुका संघापाठोपाठ जनता बँक, आजरा साखर काखाना अशी निवडणुकांची मालिका सुरू राहणार आहे. राज्यात राष्ट्रवादीची अवस्था कांहीही असली तरी तालुक्यात मात्र राष्ट्रवादी भक्कम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत असणारा सत्तासंघर्षच निवडणुका रंगतदार बनविणार आहे.
आजरा तालुक्यात राजकीय ‘त्रांगडं’
By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST