कोल्हापूर : पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल दोन महिलांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. प्रियंका प्रवीण पाटील (२८) व प्रतीक्षा प्रवीण पाटील (२३, दोघीही रा. आयटीआय समोर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियंका पाटील व प्रतीक्षा पाटील ह्या दोघी शनिवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार याच्या अंगावर धावून जात त्यांच्याशी हुज्जत घातली. स्वप्नील साळोखे हा मला वारंवार शिवीगाळ करून त्रास देतो. त्याला तुम्ही सोडू नका. तुम्ही त्याच्याकडून पैसे घेऊन सोडून देता, असा आरोप करीत त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी प्रियंका पाटील व प्रतीक्षा प्रवीण पाटील या दोघींवर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.