चिपळूण: सकाळी सातची वेळ...चिपळूण एस. टी. आगारात नेहमीप्रमाणे वर्दळ होती. वस्तीच्या गाड्याही परती कडे येत होत्या. इतक्यात एक एक पोलीस कर्मचारी करीत पोलिसांचा घोळका अधिकाऱ्यांसह आला. काय झाले ही उत्सुकता ताणली जात असतांनाच झाडू, खराटे, प्लास्टिकच्या पिशव्या समोर आल्या. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्यांसह स्वच्छता सुरु केली आणि लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.चिपळूणचे पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी भारत सरकारच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला व दोन दिवसात त्याची तयारी केली. सर्व पत्रकारांनी त्यांना सहकार्य केले. आज (सोमवार) सकाळी पोलीस व पत्रकारांनी स्टँड परिसर साफ करुन प्रवाशांची वाहवा मिळवली. यावेळी निरीक्षक मकेश्वर, आगार व्यवस्थापक सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पारकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी, रुद्र अकादमीचे व महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. विविध १० ग्रुप करुन सफाईला सुरुवात झाली. जमा केलेला कचरा गोणीत भरुन तो कचरा गाडीत टाकण्यात आला. परिसर स्वच्छ झाल्यावर स्टँड परिसरात असलेले टपरीवाले, हागाडीवाले यांना गुलाबपुष्प देऊन ‘आज गुलाब देतोय, त्याच्याखाली काटे आहेत. परिसर स्वच्छ ठेवा, सहकार्य करा. कचरा कुंंडीतच टाका. पण कधी चूक केली तर कारवाईला सामोरे जावे लागेल, याचे भान असू दे. असेही सुनावण्यात आले. आपले अभियान पूर्ण करुन पोलीस व पत्रकार आले तसे निघून गेले. या स्तुत्य उपक्रमाचे प्रवाशांनी व नागरिकांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)चिपळूण परिसरात स्वच्छ भारत अभियानाच्या अभियानाने वेग घेतला आहे. सर्व शासकीय यंत्रणा या कामात गुंतली आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या (दि. ११) सकाळी ११ वाजता विरेश्वर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे.
पोलीसही उतरले स्वच्छता माहिमेत...
By admin | Updated: November 10, 2014 23:59 IST