रत्नागिरी : पोलीस कर्मचाऱ्यांचे जवीन धकाधकीचे आहे. त्यांना सातत्याने कार्यरत राहावे लागते. काही कर्मचाऱ्यांचे जीवनसाथीही नोकरीस असल्याने लहान मुलांच्या देखभालीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच चिमुकल्यांसाठी सुरू करण्यात आलेला हा पाळणाघराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्याचा अधिकाधिक मुलांसाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले.रत्नागिरी जिल्हा पोलीस दल संचलित पाळणाघराचे उदघाटन पोलीस मुख्यालयाजवळील इमारतीत प्रमुख पाहुणे न्यायाधीश देबडवार यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवार) फीत कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर उपस्थित होते. पती-पत्नी दोघेही नोकरीला असल्यानंतर मुलांच्या देखभालीची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे पोलिसांच्या मुलांसाठी पाळणाघराची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर त्यांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात आले आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाळणाघराच्या उदघाटनाचा अत्यंत भावोत्कट कार्यक्रम आज करण्यात आला. यावेळी पोलीस पालक, उपस्थित होते. उदघाटनप्रसंगी या पाळणाघरात चार मुलांनी प्रवेश घेतला आहे. मुलांच्या देखभालीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पांडे यांनी केले. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या चिमुकल्यांना हक्काचे पाळणाघर
By admin | Updated: July 22, 2014 22:16 IST