गुहागर : दारु, गुटखा, सिगारेटसह अन्य अमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतातच, तर दुसरीकडे विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे मूळदेखील व्यसनात असल्याचे आढळून येते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. गुहागरमधून या मोहीमेची सुरुवात करण्यात आली.रत्नागिरी जिल्हा पोलीस, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्था, पुणे आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या सहकार्यातून ही मोहीम २१ ते २८ जुलै या कालावधीत जिल्हाभरात राबवण्यात येत आहे. गुहागर तालुक्यातून या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, गुहागरचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनिरीक्षक अविनाश पाटील, आर. एस. आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये स्लाईड शोच्या माध्यमातून व्यसनाची सुरुवात, शरीराची हानी होते. याशिवाय कौटुंबीक व सामाजिक जीवनाचा ऱ्हास होतो, यांची माहिती दिली.जिल्ह्यात व्यसनमुक्ती अंतर्गत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पथनाट्यांमधून अमली पदार्थाच्या सेवनाचे गांभीर्य , अशा व्यसनाधिनतेमुळे होणारे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निदर्शनास आणून देत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. गुहागर आगारातील पथनाट्याने मोहिमेचा समारोप करण्यात आला. पर्यवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सागर पवार, अभिजीत पाटील, विशाल रुमडे, भारत साळुंखे यांनी नेतृत्व केले. व्ही. व्ही. टेमकर, एस. पी. शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. टी. जाधव यांनी विशेष सहकार्य केले. या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)
पोलिसांची अंमली पदार्थविरोधी जनजागरण मोहीम
By admin | Updated: July 22, 2014 21:50 IST