लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पीएलआय (प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह) या योजनेला मंजुरी दिली. त्यामुळे या योजनेतून इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, विटा, धुळे यांसारख्या विकेंद्रित वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन निर्यातक्षम उत्पादने तयार होण्यास व रोजगार वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या पत्रकात, पीएलआय या योजनेतून वस्त्रोद्योगासाठी येत्या पाच वर्षांत दहा हजार ६८३ कोटी रुपये अनुदान मिळणार असून, १९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व साडेसात लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. देशातील ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्टमध्ये गुंतवणूक वाढून रोजगार वाढेल. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या शहरांही लाभ मिळेल. जागतिक स्पर्धेत टेक्निकल टेक्स्टाइलसारखे दर्जेदार वस्त्र निर्मितीसाठी, तसेच वस्त्रोद्योगाशी निगडित राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे. योजनेमध्ये प्रामुख्याने १०० व ३०० कोटी गुंतवणूक करणारे असे दोन गट केले असून, त्यांच्या उत्पादनाशी निगडित विविध अनुदाने देण्यात येतील. त्यानुसार, योजना तयार करण्याचे काम केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यातर्फे सुरू असल्याचे म्हटले आहे.