कोल्हापूर : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गतवर्षीच्या सर्वाधिक रुग्णांच्या संख्येचा विचार करून येत्या काळात उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनास दिल्या.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व महसूल विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांमध्ये नियमांबाबत शिथिलता आली आहे. मास्कचा वापर बंधनकारक करा, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर द्या. ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण व्हावे, यावर लक्ष द्या. सर्दी, खोकलासारख्या किरकोळ कारणांकडे दुर्लक्ष करू नका. नागरिकांना तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधायला लावा, दुसऱ्या लाटेबाबत जनजागृती करा.’’
गतवर्षी आलेल्या कोरोना लाटेदरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची संख्या किती होती, याचा विचार करून पुढील काळासाठी दवाखान्यांमधील बेड, औषधे, व्हेंटिलेटर, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, नर्स यांसह सर्व वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा. गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक २१ हजार २७० रुग्णांची नोंद झाली होती. एवढे रुग्ण झाल्यावर बेडपासून ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यापर्यंत प्रचंड धावपळ उडाली. उपचार वेळेत मिळत नाहीत, म्हणूनही भीतीनेच काहींनी प्राण सोडले. ही सारी स्थिती लक्षात घेऊनच जास्तीत जास्त २२ हजार रुग्ण महिन्यांत नोंद होऊ शकतात, असे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी, असे सरकारचे म्हणणे आहे.