कोल्हापूर : कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणारे हे बालचित्रकरांचे प्रदर्शन आहे. कलावंतांनी भविष्यात अशा कलाकृती तयार करून कोल्हापूरच्या कला परंपरेचे भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील निसर्गचित्रे मंत्रालयातील आपल्या कार्यालयासाठी खरेदी केली.
कोल्हापूर आर्ट फाउंडेशन या संस्थेतर्फे बालिका दिनानिमित्त बाल चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्या आहेत. या कालावधीत प्रायव्हेट हायस्कूलची विद्यार्थिनी स्नेहा नागेश हंकारे इयत्ता आठवी व तिचा भाऊ सोहन हंकारे इयत्ता तिसरी या भावंडांनी निसर्गचित्रे रेखाटली. त्यांच्या या चित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शाहू स्मारक भवन आर्ट गॅलरीत झाले. अध्यक्षस्थानी कलादिग्दर्शक चंद्रकांत जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, मुख्याध्यापक माधव गोरे, उद्योगपती राहुल बुधले, डॉ. मिलिंद सामानगडकर, शिक्षक नेते दादा लाड, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर उपस्थित होत्या.
अध्यक्षीय समारोपात कलादिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी कलानगरीच्या प्रदर्शनातील आठवणींना उजाळा दिला. कला शिक्षणाबद्दल पालकमंत्र्यांना शालेय शिक्षणात कला विषय इयत्ता पहिली ते दहावी अनिवार्य करावा. या विषयाने विद्यार्थी खऱ्या अर्थाने सुसंस्कारित होतो. त्यामुळे हा विषय प्राथमिक शिक्षणात सक्तीचा करण्याची मागणी केली. यावेळी मान्यवरांनी चित्रे खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यानंतर त्यांचे वडील चित्रकार नागेश हंकारे, आई सुनीता हंकारे, प्रशांत जाधव यांचा विशेष सत्कार झाला. कॅमल कंपनीतर्फे या बाल चित्रकारांना रंग साहित्य दिले. चित्रकार मंगेश शिंदे यांनीही रंग साहित्य दिले.
हे प्रदर्शन शनिवार (दि. ३०) जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत सर्वांसाठी खुले राहील. चित्रांची विक्री झालेल्या रकमेतून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना कोरोना लस खरेदीसाठी मदत दिली जाणार आहे.
--
फोटो नं २४०१२०२१-कोल-चित्र प्रदर्शन
ओळ : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन कलादालनात रविवारी स्नेहा व सोहन हंकारे या बालचित्रकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नागेश हंकारे, चंद्रकांत जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
--