गांधीनगर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही शासनाने अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही त्याला गांधीनगर व्यापारी पेठेत मात्र केराची टोपली दाखवण्यात आली आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकानाचे शटर चालू-बंद करून दुकाने सुरू ठेवल्याने ग्राहकांची गर्दी वाढून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे. यावरून पोलीस प्रशासनही हतबल झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही. असे असतानाही गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय नियम धाब्यावर बसवून सुरूच ठेवल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत काही व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. गर्दीमुळे गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे.
चौकट : व्यापारी पेठ बंद असूनही गांधीनगरात एवढी गर्दी का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून, याचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडूनही यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
फोटो : १२ गांधीनगर बाजारपेठ
गांधीनगरात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंग व वाहतुकीची कोंडी झाल्याने संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे.