कोल्हापूर : गेल्या वर्षभरात कोरोनाच्या महामारीमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात भरीस भर लाॅकडाऊननंतर पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्यात होत आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्या व केंद्राने अल्पशी वाढ केली तर आंदोलनांचाही भडका उडत होता. मात्र, पेट्रोल, डिझेलचे भाव प्रतिलिटर शंभर रुपयांकडे सुरू असलेली वाटचाल पाहून कोणालाच काही कसे वाटत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गेल्या चार वर्षात पेट्रोलमध्ये सुमारे १४ ते १५ रुपये आणि डिझेलमध्ये १७ रुपयांची वाढ झाली आहे. लाॅकडाऊन काळात तीन महिने आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड अर्थात कच्चे तेलाचे दर अगदी ३० ते ३५ डाॅलर इतके कमी आले होते. त्यानंतर त्यात काही प्रमाणात वाढ झाली. तरीसुद्धा दोन्हींचे दर चढेच होते. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय कच्चे तेल बाजारातही प्रतिबॅरल १०० डाॅलर दर झाले आहेत. त्यामुळे ही वाढ काही प्रमाणात आपण समजू शकतो. मात्र, दर कोसळल्यानंतरही दर चढेच कसे राहतात. याचा उलगडा सर्वसामान्यांना होत नाही. त्यामुळे गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाने डोके वर काढत कंबरडे मोडले. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला महागाईच्या भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी राज्याकडे की केंद्राकडे दाद मागायची, असा प्रश्न पडला आहे. पेट्रोलियम कंपन्यांचे दर तर रोजच्या रोज बदलत आहेत. यापूर्वी सर्वसामान्यांना महागाई विरोधात आंदोलने करणाऱ्या पक्षांचा आधार होता. मात्र, त्यांनी आंदोलनाची तलवार म्यान केली आहे. त्यामुळे आता कोणाकडे दाद मागायची की, मूग गिळून गप्प बसायचे. अशी द्विधामन:स्थिती सर्वसामान्यांची झाली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या प्रतिलीटरचे दर असे
साल पेट्रोल डिझेल
२०१७ ७७.४६ ६३.१९
२०१८ ७९.०६ ६८.१५
२०१९ ७६.४४ ७१.१५
२०२० ८०.२५ ७१.१५
२०२१ ९१.२५ ८४.३७
प्रतिक्रिया
आधीच कोरोनामुळे संसाराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. काहीअंशी पूर्ववत करण्याचा प्रयत्न कुटुंबांचा सुरू आहे. त्यात इंधन दरवाढ म्हणजे कंबरडे मोडण्यासारखेच आहे. त्यामुळे केंद्राने प्राधान्याने इंधन दर कमी करावेत.
- दीपाली घोरपडे, गृहिणी, साने गुरुजी वसाहत
प्रतिक्रिया
कोरोनाने होत्याचे नव्हते केले आहे. त्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करून सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाई कमी करून दिलासा देण्याऐवजी हा झटका आहे. केंद्राने याचा गांभीर्याने विचार करावा.
- सविता रेडेकर, उंचगाव
कोट
केंद्र सरकार पेट्रोलियम कंपन्यांचे लाड पुरवित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दर कमी झाले तरी इंधन वाढ आणि वाढले तरीही इंधन वाढ होत आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
-नितीन पाटील, अध्यक्ष दक्षिण विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस,
प्रतिक्रिया
पेट्रोलियम कंपन्या आणि केंद्र सरकार सरचार्जच्या रूपाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहेत. कच्चे तेलाचे भाव कमी आहेत. तरीसुद्धा वारंवार केंद्र सरकार इंधन दरवाढ का लादत आहे. त्यामुळे आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार आहे.
- रघुनाथ कांबळे, सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
प्रतिक्रिया
पेट्रोल, डिझेलचे दर कमी करतो असे भाजप सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले. त्याचा केंद्राने विचार करावा.
हर्षल सुर्वे, युवासेना, राज्य कार्यकारिणी सदस्य
चौकट
इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळ, साखर, इतर डाळी, शेंगदाणे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूही अगदी पाच ते दहा रुपयांनी वाढल्या आहेत. एवढंच काय दुचाकीचे टायर महागले आहेत. मालवाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे साहजिकच सर्व वस्तूंच्या मालवाहतूक दरात वाढ झाली. पर्यायाने सर्वसामान्यांपर्यंत या वस्तू महागड्या दराने पोहचत आहेत. अनेकजणांनी एक किलोऐवजी अर्धा किलो डाळी अथवा अन्य वस्तू नेऊन संसाराचा गाडा सुरू ठेवला आहे.