इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या पाच नामनिर्देशित नगरसेवकांची अवैधरीत्या नियुक्ती झाल्याबद्दलची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी ४ सप्टेंबरला होणार आहे.नगरपालिकेकडे नामनिर्देशित नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी संबंधित नगरसेवक शिक्षण, आरोग्य क्षेत्राशी निगडित, तसेच कायदेतज्ज्ञ, अभियंता, अर्थतज्ज्ञ, प्रशासकीय सेवा बजावलेला निवृत्त अधिकारी अगर सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी असावा, असे निकष शासनाने ठरविले आहेत. मात्र, इचलकरंजी नगरपालिकेकडे नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त करताना वरील निकष पाळले नसल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयात ठेवून त्याबाबतची याचिका योगेश पाटील व अमित सिंग यांनी दाखल केली. त्याची सुनावणी न्यायमूर्ती ओक व चांदूरकर यांच्यासमोर होणार आहे.नोटिसा बजावलेल्यांमध्ये शशांक बावचकर, दादासाहेब भाटले, संभाजीराव काटकर (राष्ट्रीय कॉँग्रेस), माजी आमदार अशोकराव जांभळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) व तानाजी पोवार (शहर विकास आघाडी) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
नामनिर्देशित नगरसेवकां विरोधात याचिका
By admin | Updated: August 13, 2014 23:34 IST