एकनाथ पाटील/इंदुमती गणेश -- कोल्हापूर
पती व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या विवाहितांच्या छळाला विविध कारणे असली तरी पाठोपाठ मुलीच होणे, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी लावला जाणारा तगादा, आदी कारणांतून जिल्ह्यात विवाहितांच्या छळाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दीड वर्षात ४९८ (अ) कलमाखाली सुमारे ३०५ गुन्हे दाखल होऊन १२०० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विवाहितेच्या छळाचे प्रमाण वाढते आहे, पण त्याचवेळी या छळासाठी वापरल्या जाणाऱ्या ४९८ (अ) च्या कलमाचा गैरवापर होत असल्याचा सूर आहे. हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहे. यानिमित्ताने गावागावांत आणि पोलीस दलातसुद्धा महिलांकडून अनेक प्रकरणांत ४९८ (अ) पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. यानिमित्ताने अशा प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्याचा सद्य:स्थितीचा घेतलेला आढावा...४कित्येकदा कौटुंबिक छळाशी केवळ पतीचा संबंध असतो; परंतु सर्वांवरच सूड उगवायचा म्हणून सासू, सासरे, दीर, भावजय, नणंद, तिचा पती यांच्याविरुद्ध छळाच्या खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे समजते. पती-पत्नीमधील भांडणाचे कारण असलेले गैरसमज, हेवेदावे दूर करण्यासाठी समुपदेशन केंद्र हा प्लॅटफॉर्म आहे. छळाच्या घटनांमागे कुटुंबाला धरून न राहणे, चारित्र्यावर संशय घेणे ही सर्वाधिक कारणे आढळून आली आहेत. आमच्याकडे दीड वर्षांत २३० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १८५ अर्जांवर समझोता काढण्यात आला आहे. - मीना जगताप, सहायक पोलीस निरीक्षक महिला समुपदेशन केंद्र ४अशा गुन्ह्यांमध्ये कित्येकदा पतीसोबतच कुटुंबातील इतरांचाही नामोल्लेख केला जातो. प्रत्यक्ष छळाशी केवळ पतीचा संबंध असताना इतरांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. आरडाओरडाच जास्त ४९८ या कलमाचा गैरवापर होतो ही तक्रार फार जुनी आहे. जर स्त्रियांना कुठल्याच पातळीवर न्यायाची अपेक्षा नसेल तर तिला कायद्याचा आधार वाटतो. आपली जीवनशैली वाढवायची असेल तर सोपा उपाय म्हणजे हुंडा. ते नाही मिळाले तर कुटुंबात सामावून न घेणे, शारीरिक-मानसिक त्रास देणे त्यामुळे महिलांवरील छळाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे त्याचा गैरवापर होतो याचा आरडाओरडाच जास्त होतो. वास्तविक, ४९८ हे कलम लागले की पोलिसांना तपास करावाच लागतो. त्यात सत्यासत्यता कळतेच. - मेघा पानसरे (भारतीय महिला फेडरेशन)पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात त्यांना न्याय मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अनेकदा छळ करणाऱ्या व्यक्ती पुराव्यांअभावी निर्दोष सिद्ध होतात आणि एवढे धाडस करून हा निर्णय घेतलेल्या महिलेच्या पदरात काहीच पडत नाही, हे खूप खेदजनक आहे. काही एक-दोन टक्के महिला या कायद्याचा दुरुपयोग करीत असतीलही, पण ९९ टक्के महिला छळवणुकीला बळी पडलेल्याच असतात. शिवाय प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग केला जातोच, मग ४९८ चाच बाऊ का केला जातोय. काहीअंशी या कायद्याच्या धाकाने का असेना त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण कमी होते. - अॅड. पल्लवी थोरात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये समुपदेशन करण्यासाठी पोलिसांमार्फत स्वतंत्र केंद्र चालविले जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती मीना जगताप या केंद्राच्या प्रमुख आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता काही गंभीर बाबी पुढे आल्या. विभक्त कुटुंब, चारित्र्यांवर संशय, दारूचे व्यसन, त्यातून होणारी मारहाण, मुली जन्माला येणे, सतत फोनवर बोलणे, माहेरच्या लोकांचा अवाजवी हस्तक्षेप, पैशाची चणचण, आदी कारणे पुढे आली आहेत.या कारणांमुळे पती-पत्नीमध्ये खटके उडणे, मारहाण, माहेरी निघून जाणे, नातेवाइकांकडून नातेसंबंधाचा कोणताही विचार न करता पोलिसांतील तक्रारीसाठी अथवा थेट न्यायालयातील खटल्यासाठी प्रोत्साहित करणे, असे प्रकार घडत आहेत. माहेरच्या पाठबळामुळे आणि आर्थिक संपन्नतेमुळे अनेकदा मुली इच्छा नसूनही पती व सासरच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करीत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर सध्या मुला-मुलींना मोकळीकता हवी आहे. कोणाचेही बंधन नको, पतीसोबत मित्रही हवा, तर पत्नीबरोबर मैत्रीणही हवी, अशा काही मानसिकता मुला-मुलींच्या तक्रारी केंद्राकडे आल्या आहेत; परंतु समाजामध्ये अशा गोष्टींना मान्यता नसल्याने या तक्रारी वाढू लागल्या आहेत.समुपदेशन केंद्रात गेल्यानंतर मात्र अनेक प्रकरणात तडजोड होते. त्यांची चूक त्यांना कळते. कित्येकदा तर पती-पत्नीचा वादच नसतो. त्यांच्या नातेवाइकांनी दोघांचेही कान भरून तो उभा केला असल्याचे जाणवते. अशा प्रकरणात समुपदेशन केंद्रातर्फे पती-पत्नीसह नातेवाइकांना योग्य मार्गदर्शन केले जाते. पोलीस ठाण्यापर्यंत गेलेली कौटुंबिक छळाची कित्येक प्रकरणे समुपदेशनाने मिटली आहेत. त्यांचे संसार तुटण्यापासून वाचले आहेत. आजही ते गुण्यागोंविदाने नांदत आहेत. यातूनही काही ताठर भूमिका घेतात आणि गुन्हे दाखल होतात. त्यातूनच हा आकडा वर्षाकाठी ४५ च्या घरात पोहोचला आहे.