कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या महाद्वार चौकातील फेरीवाले हटले असले तरी त्या ठिकाणी आता वाहने पार्किंग सुरू झाले आहे. यामुळे फेरीवाल्यांतून तीव्र प्रतिक्रिया येत असून, महापालिका आणि शहर वाहतूक शाखेकडून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
महापालिकेने महाद्वार चौकापासून २५ मीटरपर्यंत परिसर फेरीवालामुक्त केला आहे. येथील फेरीवाल्यांचा विरोध असतानाही त्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये फेरीवाले आणि महापालिकेचा संघर्ष सुरू झाला आहे. आवळे, चिंचा आणि रांगोळी विक्रेत्यांचा विरोध डावलून त्यांना हटविण्यात आले. फेरीवाला कृती समितीनेही महापालिका प्रशासनाला सहकार्य केले. यामुळे अनेक दिवसांनंतर महाद्वार चौकाने मोकळा श्वास घेतला. एकीकडे परिसर मोकळा करण्यासाठी फेरीवाल्यांना हटविले असले तरी दुसरीकडे महाद्वार चौकात रिक्षा, दुचाकी आणि पर्यटकांची वाहने लावण्याचा प्रकार वाढत आहे. यामुळे कारवाई केलेल्या फेरीवाल्यांमधून शनिवारी संतप्त प्रतिक्रिया उमटली.
चौकट
दिवसभर पथक ठाण मांडून
महापालिकेने महाद्वार चौकपासून २५ मीटर परिसरात पट्टे मारले असून, यामध्ये कोणालाही व्यवसाय करण्यास बसू दिले जात नाही. फेरीवाले पुन्हा येथे बसू नयेत म्हणून शनिवारी दिवसभर १५ कर्मचार्यांचे अतिक्रमण निर्मूलन पथक येथे ठाण मांडून होते. काही रांगोळी, आवळे विक्रेत्यांनीही २५ फुटांबाहेरच विक्री सुरू केल्याचे दिसून आले.
फेरीवाल्यांची पु्न्हा बैठक
महापालिकेच्या कारवाईच्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, फेरीवाला कृती समिती प्रतिनिधी यांची शासकिय विश्रामगृह येथे बैठक आहे. या बैठकीमध्ये कोणते मुद्दे मांडावे, कोणी बोलावे याच्या नियोजनासाठी शनिवारी महाराणा प्रताप चौकात निमंत्रक आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना बैठक होत नाही तोपर्यंत बसू नये, असे आवाहन करण्यात आले.