दिंडनेर्ली : दिंडनेर्ली ते इस्पुर्ली (ता. करवीर) दरम्यान असणाऱ्या पाझर तलावाच्या भराव्यास चर मारून तलावातील पाणी सोडण्याचे काम अज्ञातानी केले. पण सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने पाझर तलाव फुटून मोठी दुर्घटना टळली. या प्रकाराचा शेतकऱ्यांनी निषेध केला असून इस्पुर्ली पोलिसांत तक्रार दिली आहे.
कोल्हापूर-गारगोटी मार्गावरती दिंडनेर्ली जवळील राजीवजी सूतगिरणी शेजारी पाझर तलाव आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या तलाव्याच्या भराव्यावरून शेतकरी शेतीकडे ये-जा करतात. तर तलावाच्या खालील बाजूस शेकडो एकर शेतीचे क्षेत्र असून कित्येक शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे आहेत. गुरुवारी सायंकाळी अज्ञातानी भरावात चर मारून तलावातील पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आहे पण सुदैवाने रात्री पावसाचा जोर कमी राहिल्यामुळे या चरीतून पाणी गेले नाही.