कºहाड : ‘रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची ९ मे रोजी निवडणूक होत आहे. १९८९ पासून शरद पवार संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर एन. डी. पाटील कार्याध्यक्ष होते. १९९४ साली या दोघांनी रयत शिक्षण संस्थेच्या घटनेत बदल केले. त्यामुळे संस्थेत लोकशाही नव्हे तर हुकूमशाही नांदत आहे. त्यामुळे पवारांनी यंदाच्या निवडणुकीत अर्जच दाखल करू नये,’ अशी मागणी संस्थेचे माजी लाईफ मेंबर, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रा. यू. जी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, शरद पवार संस्थेत घुसल्यापासून त्यांनी मेहुणे एन. डी. पाटील, पुतणे अजित पवार, बहीण सरोज पाटील, मुलगी सुप्रिया सुळे यांना ‘रयत’च्या जनरल बॉडीवर सदस्य करून घेतले आहे. ही पद्धत चुकीची आहे. पवार व त्यांचा गोतावळा संस्थेचा मालक बनला आहे. त्यामुळे येथील कर्मचारी रयत सेवक राहिलेले नाहीत. आज कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था व इतर शिक्षण सम्राटांच्या शिक्षण संस्थात फरक राहिलेला नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत’ श्क्षिण संस्थेची स्थापना केली. पण, त्यांच्या हयातीत त्यांनी कोणत्याही शाळा कॉलेजला स्वत:चे नाव दिले नाही व देऊ दिले नाही; पण शरद पवारांनी जिवंतपणीच लोणंद, ता. खंडाळा येथील कॉलेजला स्वत:चे नाव देऊन स्मारक निर्माण केले आहे. तर प्रा. एन. डी. पाटील यांनी त्याचेच अनुकरण करून कोल्हापूर जिल्ह्यातील एका कॉलेजला स्वत:चे नाव दिले आहे. आता त्यांनी संस्थेतून बाहेर पडले पाहिजे, अशी संस्थेच्या अनेकांची अपेक्षा आहे. शरद पवार व प्रा. एन. डी. पाटील यांनी अंतरमनाचा कौल घ्यावा व या निवडणुकीतून बाजूला व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
‘रयत’च्या अध्यक्षपदासाठी पवारांनी अर्जच भरू नये
By admin | Updated: May 8, 2014 12:04 IST