जहाॅंगीर शेख
कागल : राज्यात असलेल्या सत्तेचा प्रभाव स्थानिक पातळीवर कसा उमटतो, याचे प्रतिबिंब लिंगनूर दुमाला येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पाहावयास मिळते. पाच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युती होती. तेव्हा गावात ग्रामपंचायत निवडणुकीत मुश्रिफ गटाविरूद्ध राजे, मंडलिक, संजय घाटगे गट एकत्र आले होते. आता राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुश्रिफ, मंडलिक आणि संजय घाटगे गट एकत्र आले असून राजे गट एकाकी पडला आहे.
कागल शहराला लागून असलेले हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. कागलकरांची शेतजमीन या गावात मोठ्या प्रमाणात आहे. पुणे म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजपाचा प्रभाव ज्या काही गावांत अधिक प्रमाणात वाढवीला, त्यामध्ये या गावाचा समावेश आहे. पण या ठिकाणी मुश्रिफ गटाची ताकत जास्त असून संजय घाटगे गटही आपली ताकत राखून आहे. महाविकास आघाडी करताना मुश्रिफ गटाला सात, तर मंडलिक-संजय घाटगे गटाला प्रत्येकी दोन असे जागावाटप केले आहे. पाच वर्षापूर्वी मुश्रिफ गटाने तीन गटाविरुद्ध लढत देत चार जागा मिळवल्या होत्या. तीन वर्षानंतर राजे गटाचे सरपंच दत्तात्रय पाटील यांनी मुश्रिफ गटात प्रवेश केल्याने मुश्रिफ गटाची सत्ता आली.
मंत्री मुश्रीफांचे गाव म्हणूनही महत्त्व
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांचे नाव या गावातील मतदार यादीत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवून आमदारकीचे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी कागल शहर सोडून ग्रामीण मतदार यादीत नाव समाविष्ट केले. गेली तीस वर्षे ते आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी सकाळी आठ वाजता या गावात हजर असतात.
उपसभापतीपद
पंचायत समिती निवडणुकीसाठी या गावातून रमेश तोडकर राष्ट्रावादीतून निवडून आले. उपसभापती म्हणून मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. आता ते सभापती पदाचे दावेदार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबगोंडा पाटील यांनाही मानणारा वर्ग या गावात आहे.