कोल्हापूर : ‘नॅक’च्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठात अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल ग्रंथालय सुरू करण्याचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, मंगळवारी येथे सांगितले. अंध विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे आयोजित माहिती व तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण (आयसीटी ट्रेनिंग) कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, शिक्षणाची साधने काळानुसार बदलत आहेत. अशा स्थितीत आधुनिक, डिजिटाइज्ड साधनांचा अंगीकार करणे गरजेचे बनले आहे. यात अंध विद्यार्थ्यांनी मागे राहून चालणार नाही. त्यांनी आयसीटी बेस्ड प्रणालीचा अधिकाधिक वापर करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. त्यांनी स्पर्धात्मक युगात विद्यापीठातर्फे उपलब्ध आधुनिक साधनांचा वापर करून कौशल्यप्राप्ती करून घ्यावी. कार्यक्रमात ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी अंध व्यक्तींसाठी सुरू केलेल्या स्टडी सेंटरची माहिती दिली. यावेळी डॉ. अंजली निगवलकर, विनायक पोवार, किरण चेचर, सुप्रिया काटकर व रूचिरा सनदी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक ग्रंथपाल पी. बी. बिलावर यांनी स्वागत केले. सागर लाटकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक ग्रंथपाल डी. बी. सुतार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनया कार्यक्रमासाठी विषयतज्ज्ञ म्हणून इंग्रजी अधिविभागाचे अंध सहायक प्राध्यापक डॉ. मनोहर वासवानी यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. त्यांनी दोन सत्रांत अंध विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध तंत्रज्ञान आणि करिअर संधी या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस संलग्नित महाविद्यालये व अधिविभागांतील एकूण ८० विद्यार्थी, प्राध्यापकांसह ग्रंथालय विभागातील प्रशासकीय सेवक तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
ब्रेल ग्रंथालय सुरू करण्याचा मानस
By admin | Updated: January 14, 2015 00:29 IST