कोल्हापूर : एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर अंडरग्रॅज्युएट (नीट) परीक्षा रविवारी कोल्हापुरातील विविध सात केंद्रांवर झाली. त्यात केआयटी महाविद्यालयासह सर्व केंद्रांवरील परीक्षार्थींना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नियमानुसार वेळेत पेपर (प्रश्नपत्रिका) देण्यात आली आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत या सात केंद्रांवर दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत परीक्षा घेण्यात आली. त्यात केआयटी महाविद्यालय या केंद्रातील ४१ क्रमांकाच्या ब्लॉकमध्ये पेपर वीस मिनिटे उशिरा दिल्याची एका परीक्षार्थीची तक्रार होती. त्यावर या केंद्रातून विद्यार्थ्यांना पेपर दिल्याची वेळ, आदींबाबतची माहिती सोमवारी घेतली, तसेच संबंधित परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी पेपर देण्याबाबतच्या वेळेवरून या परीक्षार्थीच्या मनात संभ्रम होता. चर्चा केल्यानंतर तो दूर झाला. पेपर उशिरा दिल्याबाबतची कोणत्याही परीक्षार्थीची तक्रार नसल्याचे या परीक्षेच्या शहर समन्यवक शिल्पा कपूर यांनी सांगितले. पेपर असलेल्या ट्रंकला डिजिटल लॉक असते. हे लॉक ‘एनटीए’ने निश्चित केलेल्या वेळेवर केंद्रीय पद्धतीने खुले होते. त्यानंतर ब्लॉकमध्ये परीक्षार्थींना पेपर वितरित करण्यापूर्वी पेपरच्या पाकीटवर तेथील दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरी घेतली जाते. या परीक्षार्थींनीदेखील योग्य वेळ नोंदविली आहे. सर्व परीक्षार्थींना वेळेत पेपर देण्यात आला असल्याचे कपूर यांनी सांगितले.