सांगली : येथील विश्रामबाग गणपती मंदिराजवळ असलेल्या गणराज पानटपरीमध्ये पान व्यवसाय करणाऱ्या वडिलांना मदत करीत अनिता फोंडे हिने बारावीच्या परीक्षेत कला विभागात ८३.६९ टक्के गुण मिळवले. समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करीत, घरकाम सांभाळून अनिताने मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले आहे. राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. अनिताच्या घरी पहिल्यापासूनच एकत्र कुटुंबपध्दती असून तिचे वडील राजू फोंडे यांची पानटपरी आहे. अनिता ही त्यांची एकुलती एक मुलगी. नववीपासूनच ती वडिलांना पानटपरीत मदत करू लागली. वडिलांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तिनेही वडिलांना, ‘अभ्यासात कोठेही कमी पडणार नाही’, असा शब्द दिला. अनिताला दहावीत ८१ टक्के गुण मिळाले आहेत. तिने जाणीवपूर्वक कला शाखा निवडली. बारावीत असताना तिने दिवसातील बहुतांश वेळ पानटपरीत वडिलांना मदत करण्यातच घालवला. अनेक मैत्रिणींनी शिकवणी लावली होती, पण शिकवणी लावायची नाही, असे तिने ठरविले होते. याकरिता तिने वर्षभरात एक दिवसही महाविद्यालय चुकविले नाही. प्रत्येक तासाला उपस्थित राहून, काही शंका आल्यास शिक्षकांना विचारून त्यांची सोडवणूक करण्यावर भर दिला. सकाळी सहा वाजता उठून घरकामात मदत करणे, त्यानंतर महाविद्यालय, दुपारी व सायंकाळी पानटपरीत वडिलांना मदत, रात्री अभ्यास, असा तिचा वर्षभराचा दिनक्रम होता. प्राचार्य एम. एस. वाझे आणि घाडगे सर यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने सांगितले. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी होण्याचे ध्येयकला शाखा जाणीवपूर्वक निवडल्याचे सांगून अनिता म्हणाली की, कला शाखेमुळेच सर्वांगीण ज्ञान प्राप्त होते. दहावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असून भविष्यात जिल्हाधिकारी बनण्याचे ध्येय ठेवूनच अभ्यास करीत आहे. बारावीत असताना उगाचच अभ्यासाचा अतिरिक्त ताण न घेता दररोज नियमित लक्षपूर्वक अभ्यास केल्यानेच यश मिळाले. कला शाखेत कमी गुण मिळतात, असा समज अनिताने खोटा ठरवला. तिने किचकट वाटणाऱ्या इतिहास विषयात १०० पैकी ९२ गुण मिळविले आहेत, तर मराठीत ८६ गुण संपादन केले आहेत.
पानटपरी सांभाळून अनिता महाविद्यालयात पहिली
By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST