पन्हाळा : गेल्या काही दिवसांपासून पन्हाळा शहरात बिबट्याचा वावर वाढल्याने सायंकाळी लवकरच संपूर्ण शहर बंद होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पन्हाळा शहर नैसर्गिक आपत्ती व कोरोना यामुळे बंद आहे. याचा परिणाम जंगली प्राणी व पक्ष्यांची वाढ त्याचबरोबर झाडांची व झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरे तर पन्हाळा आणी बिबट्या हे खूपच जुने समीकरण असले, तरी या बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याने त्यांना अपेक्षित खाद्य जंगलात मिळत नसावे, यामुळे बिबट्या वस्तीत शिरू लागला आहे. सहज मिळणारे खाद्य म्हणजे कुत्रा. रोज किमान दोन कुत्र्यांची बिबट्या शिकार करत आहे.
पन्हाळ्यावर सध्या जोरदार पाऊस, दाट धुके यामुळे सायंकाळी दोन फुटावरचे काहीही दिसत नाही. यातच स्ट्रीट लाईट सगळीकडे आहेच, असे नाही आणि असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. सर्वत्र एखाद्या गूढ चित्रपटात पाहावे, असेच प्रत्यक्ष वातावरण आणि चारच दिवसांपूर्वी रात्री नऊ वाजता बाजीप्रभू पुतळ्याजवळ काही लोकांना बिबट्या दिसला, तर काहींना सायंकाळी सहा वाजता धान्याचे कोठार परिसरात दिसला. रोज प्रत्येकजण बिबट्याचे माग सांगत असल्याने शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला सायंकाळनंतर बाहेर पडत नाहीत. रोज बिबट्या बाजारशेड, एस. टी. स्टॅन्ड, शिंगगल्ली या परिसरातील आपले भक्ष्य घेऊन जातो.
याबाबत पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांना विचारले असता, ते म्हणाले की, जंगल समृद्ध आहे म्हणून या जंगलात बिबट्याचे वास्तव्य आहे. याचा वनविभागास अभिमान आहे. बिबट्यांची जनगणना केलेली नाही, तरीसुद्धा नऊ ते दहा बिबट्यांची संख्या असावी, असा अंदाज असून, त्याला सहज पकडता येणाऱ्या भक्ष्याला तो अग्रक्रम देतो. मानवी वस्ती जंगलाला लागूनच आहे.