लढा पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा..
विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या कोल्हापूर महापालिकेने गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध उपाययोजनांना आता चांगले यश आले आहे. आजच्या घडीला शहरातील ९५ टक्के सांडपाणी अडविण्यात व त्यावर प्रक्रिया करण्यात महापालिका यशस्वी झाली आहे. शहरातील प्रतिदिन तयार होणारे ९६ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाण्यापैकी सध्या महापालिका ९१ टक्के पाण्यावर प्रक्रिया करत आहे. राज्यात एवढे चांगले काम अन्य कोणत्या महापालिकेकडून झालेले नाही. अजून काही प्रस्तावित कामे गांभीर्याने मार्गी लावली तर कोल्हापूर महापालिकेच्या प्रदूषणमुक्तीच्या कामाची देशपातळीवर दखल घेतली जाईल, असा दावा महापालिका यंत्रणेकडून केला जात आहे.
अमृत योजनेतून भुयारी गटर योजनेसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून ११३ किलोमीटर वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यातील ५७ किलोमीटरचे (५५ टक्के) काम झाले आहे. यापैकी अजून एकही वाहिनी मुख्य वाहिनीला जोडलेली नाही. शहरात प्रतिदिन ९६ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यावर दोन ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे. ७६ एमएलडीचा प्रकल्प कसबा बावडा येथे आहे. त्यास लाइन बझार, बापट कॅम्प, जयंती, जुना बुधवार, सीपीआर आणि जामदार क्लब हे सहा नाले जोडले आहेत. अजूनही लक्षतीर्थ, राजहंस, रमणमळा, वीटभट्टी नाला असे चार नाले जोडण्याचे काम सुरू आहे. दुधाळी या १७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला रंकाळ्यात मिसळणारे चार नाले वळविण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरले जात आहे किंवा ते नदीत सोडण्याइतके स्वच्छ आहे. ज्या पाण्यातील जैविक प्राणवायूचे प्रमाण ३० बीओडीपर्यंत आहे ते पाणी हानिकारक नाही, असे मानले जाते. महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पातून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी ७.५ बीओडीचे आहे. शहरातील वाढीव सांडपाणी विचारात घेऊन आणखी सहा एमएलडीचा प्रकल्प दुधाळी येथे करण्यात येत असून, त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. बावडा प्रकल्पाची क्षमता आणखी चार एमएलडीने वाढवण्यात येणार आहे. थेट काळम्मावाडी योजना पूर्ण झाल्यानंतर आणखी १० एमएलडी सांडपाणी वाढू शकते. त्यासाठी लोणार वसाहत परिसरात तेवढ्याच क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम सुरू आहे.
चढत्या श्रेणीने बिल आकारणी
पाण्याचे बिल चढत्या श्रेणीने आकारणी करणारे कोल्हापूर ही देशातील एकमेव महापालिका आहे. ज्याचा पाण्याचा जास्त वापर त्याने जास्त बिल भरावे असे त्यामागचे तत्त्व आहे. त्याशिवाय महापालिका सांडपाणी अधिभारही वसूल करते. सांडपाणी कमी करणे आणि त्यावर प्रक्रिया करून पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करणे असा दुहेरी हेतू त्यामागे आहे.
नागरी सांडपाणी
सर्वात जास्त : कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका त्यानंतर ग्रामपंचायती.
औद्योगिक सांडपाणी
सर्वात जास्त : इचलकरंजी, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इतर औद्योगिक क्षेत्रे व त्यानंतर साखर कारखाने.