कोरेगाव : रंगनाथस्वामींची निगडी (ता. कोरेगाव) येथील श्री निजानंद रंगनाथस्वामी मंदिरातून सोमवारी रात्री सुमारे ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या रिध्दी-सिध्दी देवीच्या मूर्ती चोरीस गेल्या. मंगळवारी सकाळी पूजेसाठी गेलेल्या पुजाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांचे श्वान मंदिर आणि प्रवेशद्वार परिसरातच घुटमळले.अत्यंत प्राचीन मूर्ती हा अमूल्य ठेवा असून, खुल्या बाजारात त्याची किंमत कोटींमध्ये असल्याचा अंदाज आहे. तथापि, सद्य:स्थितीत मूर्तीची किंमत सव्वा लाख रुपये असल्याचे रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी येथील श्री निजानंद रंगनाथस्वामींच्या प्राचीन मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री निजानंद रंगनाथस्वामींची समाधी असून, त्यावर पितळी मुखवटा आहे. मुखवट्याच्या दोन्ही कानांमध्ये सोन्याच्या भिकबाळ्या आहेत. मुखवट्याच्या वरच्या बाजूस लटकती चांदीची छत्री आहे. बाजूलाच चांदीचे अभिषेकपात्र व पंचारती आहे. समाधीच्या पाठीमागील बाजूस विठ्ठल-रुक्मिणीची दगडी मूर्ती आहे. त्याच्याच शेजारी पुरातन काळातील दोन पंचधातूच्या रिध्दी-सिध्दीच्या मूर्ती आहेत. समाधीसमोर रामाची छोटी मूर्ती आहे. मंदिराचे विश्वस्त म्हणून डॉ. सच्चिदानंद गोसावी व प्रसन्न गोसावी काम पाहतात. प्रकाश डोईफोडे व कुटुंबीय पूर्जा-अर्चा करतात. मंदिराची स्वच्छता करण्याचे काम प्रशांत पांढरे यांच्याकडे असून, ते मंदिर परिसरातच वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमारास चिन्मय डोईफोडे हा मंदिरात आला आणि श्रींची आरती करून दरवाजा लावून तो घरी गेला. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चैतन्य मंदिरात पूजेसाठी आला असता त्याला गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला. संशय आल्याने त्याने गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता, रिध्दी-सिध्दीच्या मूर्ती गायब असल्याचे निदर्शनास आले. त्याने प्रशांत पांढरे यांना कळविले. पांढरे यांनी विश्वस्त डॉ. सच्चिदानंद गोसावी यांना चोरीची माहिती दिली. काही वेळेतच गोसावी व कुटुंबीय कोरेगावातून निगडी येथे पोहोचले. त्यांनी तातडीने रहिमतपूर पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे व उपनिरीक्षक धनंजय बर्गे यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने मंदिरास भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपअधीक्षक मधुकर गायकवाड यांना ढगे यांनी चोरीची माहिती दिली. दुपारी दोनच्या सुमारास श्वानपथक निगडी येथे पोहोचले. गाभाऱ्यातील अन्य मूर्तींचा वास दिल्यानंतर श्वान मंदिर परिसरात घुटमळले. याप्रकरणी डॉ. सच्चिदानंद गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)शिवशाहिरांनी केली होती पाहणीमंदिर परिसरात पत्रकारांशी बोलताना डॉ. सच्चिदानंद गोसावी यांनी रिध्दी-सिध्दीची मूर्ती अंदाजे ४५० वर्षांपूर्वी असल्याचे सांगितले. १९८३-८४ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मंदिरास भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी अत्यंत बारकाईने या मूर्तींची पाहणी केली होती. ‘या मूर्तींचे व्यवस्थित संवर्धन करायचे झाल्यास त्या पुरातत्त्व विभागाकडे द्या. मूर्तींची किंमत अंदाजे २५ ते ३० लाख रुपये असेल,’ असा अंदाज त्यांनी वर्तविला होता. परंतु हा अमूल्य ठेवा मंदिरातच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे त्यांनी सांगितले. मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरमंदिर परिसराला दगडी भिंत असली तरी सुरक्षेबाबत दक्षता घेतली नसल्याने पोलिसांनी हतबलता व्यक्त केली. अत्यंत प्राचीन मंदिर आणि मूर्ती असल्याने मंदिराच्या विश्वस्तांनी सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मंदिर आणि परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज असून, मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा अधिक मजबूत करून कुलूप घालणे गरजेचे असल्याचे विश्वस्तांना कळविणार आहोत, असे त्यांनी सांगितले. चोरीमागे ‘मास्टरमार्इंडच’ गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिराच्या चहूबाजूने दगडी भिंत आहे. मंदिर परिसरात सेवेकऱ्यांचे वास्तव्य आहे. मंदिरात दिवसभर वर्र्दळ असते. दूरवरून भाविक वर्षभर दर्शनासाठी येतात. मंदिर साधारणत: सोळाव्या शतकातील आहे. मुख्य गाभाऱ्यात सोन्याचे, चांदीचे दागिने असताना चोरट्यांनी त्यांना हातही लावला नाही. केवळ पंचधातूच्या मूर्ती चोरुन नेल्याने पोलीस चक्रावले आहेत. ‘मास्टरमार्इंड’ चोरट्याने बारकाईने निरीक्षण करून योजना आखल्याच्या अंदाजापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. आंतरराज्य टोळीचा संशयमंदिरात कोट्यवधी रुपये किंमतीच्या प्राचीन पंचधातूच्या मूर्ती असल्याची माहिती घेऊन आंतरराज्य टोळीने सूत्रबध्दपणे चोरीची मोहीम राबविली असावी असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. मंदिरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांना हात न लावता, केवळ मूर्ती नेल्याने यामागे टोळीच असल्याचे त्यांना प्रथमदर्शनी वाटत आहे.
पंचधातूची मूर्ती चोरीस
By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST