यवलूज : पन्हाळा तालुक्यातील शेतकरी ऊस या प्रमुख पिकासह भाताचे पीक घेतात. तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताचे भरघोस उत्पादन मिळावे, या उद्देशाने राज्य कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत पन्हाळा तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने यंदा खरीप हंगामात ७० एकर क्षेत्रावर भात पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच पाच एकर क्षेत्रावर वरी पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.
या अनुषंगाने तालुक्यातील विविध ठिकाणी ५० एकर क्षेत्रावर चारसुत्री भात पीक प्रात्यक्षिक तसेच २० एकर क्षेत्रावर स्थानिक वाणांचे भात पीक लागवड प्रात्यक्षिक राबविण्यात येणार आहे. पाच एकर क्षेत्रावर वरी लागवड करण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांना वरीचे बियाणे दिले जाणार आहे. भात पीक प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत तीन प्रकारची जीवाणू खते, युरिया ब्रिकेट, नीम अर्क पुरविले जाणार आहे. तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बांधावर जाऊन भाताचे भरघोस उत्पादन कसे घ्यावे, याविषयी शेतीतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या भात पीक प्रात्यक्षिकांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालिका सुनंदा कुराडे यांनी केले आहे. सध्या बीज प्रक्रिया व उगवण क्षमता याविषयी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एस. चौगले हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यासाठी तालुका कृषी अधिकारी आर. डी. धायगुडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एस. चौगले व कृषी सहाय्यकांचे सहकार्य मिळत आहे.